पंतप्रधानपदावरून काँग्रेसचा चोवीस तासांतच यू टर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना पंतप्रधानवरून राजकीय चर्चांनी जोर पकडला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येऊ नयेत यासाठी पंतप्रधानपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शविणाऱया काँग्रेसने यू टर्न घेतला आहे. काँग्रेस सर्वात जुना आणि मोठा राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव गुलाम नबी आझाद यांनी मांडली.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीच गुरुवारी पंतप्रधानपद मिळाले नाही तरी चालेल असे वक्तव्य केले होते. यावरून 24 तासांतच काँग्रेसने यू टर्न घेतला आहे. पंतप्रधानपदासाठी काँग्रेस इच्छुक नाही हा दावा खोटा आहे. आम्हाला केवळ एनडीएला सत्तेपासून दूर ठेकायचे आहे. आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यास सर्वानुमते निर्णय घेऊन पंतप्रधान ठरवला जाईल, असे स्पष्टीकरण आझाद यांनी दिले आहे.

भाजपविरोधकांचे 23 मेच्या बैठकीकडे लक्ष

पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावरून विरोधी पक्षांमध्ये अजूनही मतभेद आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व एकत्र आहेत असे दाखवत असले तरी पंतप्रधानपदासाठी त्यांना उमेदवार निवडता आला नाही आणि महाआघाडीही करता आली नाही. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी भाजपविरोधातील सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.