
सामना प्रतिनिधी, अहमदपूर
शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार विनायकराव पाटील यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजने अंर्तगत 44 कोटी 52 लाख रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुर करून आणले होते. परंतु हे पाणीपुरवठा योजनेचे काम नांदेड येथील सानप .आर.जी. कन्स्ट्रक्शन या गुत्तेदाराने हे काम वेळेत पूर्ण केले नसल्यामूळे गुत्तेदाराला प्रतिदिन दंड म्हणून एका दिवसाला बारा हजार 790 रु. दंड लावण्यात आला.
साठवण तलावातील जॅकवेल विहीर पाण्यापासून 18 फूट अलीकडे चुकीचे काम केले असून त्याचबरोबर जोड पुलाचे कामही वेळेत पूर्ण झाले नाही, तसेच उद्धरण नालिका, जलशुद्धीकरण व्यवस्था लिंबोटी ते अहमदपूरपर्यंतची पाईपलाईन मार्च अखेर पूर्ण करणे बंधनकारक होते पण अदयाप पर्यंत दहा ते पंधरा दिवसा पासून गुत्तेदाराने काम बंद केले आहे. योजनेची 23 फेबुवारी 2018 रोजी कामाची वर्क ऑर्डर गुतेदाराला देण्यात आली होती २४ महिन्यात सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक आहे .लिंबोटी पासून अहमदपूर पर्यंतचे 19 किमीचे खोदकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम मार्च अखेर पूर्ण होणे बंधनकारक असताना काम अपूर्ण आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
जलशुद्ध केंद्रामध्ये 90 लाख लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता आहे शहराला पाणी पुरवठा करणारे दोन जलकुंभ आहेत त्यात एक नऊ लाख पन्नास हजार लिटर तर दुसरी 21 लाख 42 हजार लिटर क्षमतेची आहे यामध्ये एकाचे काम बंद असून दुसऱ्याचे काम अर्धवट आले आहे दोन्ही कामे अद्याप अपूर्णच आसल्याचे सांगण्यात आले. एका दिवसाला 12 हजार 790 रुपये प्रमाणे हा दंड लावण्यात आला असून महिन्याला 3 लाख 80 हजार प्रमाणे आजपर्यंत 25 लाख दंड झाला आहे. दरम्यान गुत्तेदार जिल्हा न्यायालयात गेल्यामुळे या वसुलीस स्थगिती दिली असल्याचे नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता जी. एस. पुरी यांनी सामनाशी बोलतांना सांगितले.
संबधित गुत्तेदारास तीन ते चार नोटीसा दिल्या आहेत, या गुत्तेदाराचे जिल्ह्यातील मोठ्या अधिकाऱ्यांशी धागेदोरे असल्याने जिल्ह्यातील अधिकारी पाठीशी घालत असल्याची व याची सर्व बिले दडपशाही मार्गाने वेळेत काढायला लावत असल्याची चर्चा शहरात होत आहे.
























































