उदगीर येथे घरफोडी सत्र सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

उदगीर शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून पुन्हा एक घरफोडीचा प्रकार घडला आहे. शहरातील कुणेकरी गल्ली मधील घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 50 हजार पेक्षा अधिक ऐवज पळवला.

उदगीर शहर पोलीस ठाण्यात सदरील चोरी प्रकरणी जयराम मल्लीकार्जुन सोलापुरे यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी हा मुखेड येथे ट्रॅव्हल्स तिकीट बुकींगचे काम करतो. तिकीटाचे जमलेलेले 17000 रुपये जमा करून 18 रोजी रात्री तो घरी आला. पैसे कपाटात ठेवून फिर्यादी, त्याची आई, पत्नी व एक भाऊ असे सर्वजण घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले. दुसरा भाऊ बस्वराज सोलापूरे हा मात्र खोलीत झोपला. घरात आवाज आल्याने गच्चीवरुन सर्वजण खाली आले असता फिर्यादीच्या खोलीचे दार सताड उघडे दिसले. 19 मे रोजी पहाटे 1 ते 3 या कालावधीत चोरट्यांनी लोखंडी कपाट उचकटून कपाटातील सोन्याचे झुमके 12 ग्रॅम, 5 ग्रॅमची अंगठी, सोन्याचे दोन पान, रोख रक्कम 17000 रुपये, दोन मोबाईल असा सुमारे 46 हजार 50000 रुपयाचा ऐवज पळवला. त्याचप्रमाणे फिर्यादीचा भाऊ बालाजी सोलापूरे याच्या खोलीतील चांदीचे 23 तोळे वजनाच्या चार चैनचे जोड, चांदीचे 3 तोळे वजनाचे तीन लिंग, 32 तोळ्याचे चांदीचे दागिने पळवण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.