।। श्री शंकरगाथा ।। 30

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खिचडीचा ‘प्रसाद’

श्रीमहाराज सिद्धसत्पुरुष होते मात्र त्यांच्या असामान्यत्वाच्या मागे एक लहान निरागस मूल दडलेले होते. या निष्पाप मुलाची जपणूक करणे हेच श्रीमहाराजांच्या अंतरंगातील भक्तांचे खरे कसब होते. श्रीमहाराजांचे जेवण पाहिल्यास अगदीच कमी होते. मात्र त्यांच्या मनांत आले तरच खाणे होत असे अन्यथा कधीकधी ते उपाशीच राहात असत. श्रीमहाराज विलक्षण मनस्वी होते. त्यांना स्वतःच्या हाताने खाणे कधी शक्य झाले नाही कारण ते स्वहस्ते जेवू गेल्यास अंगभर अन्न सांडीत असत. कोणी भरवू पाहिल्यास ते चंचल बाळाप्रमाणे लळतलोंबत जेवत असत. अशावेळी त्यांच्या मर्जीतील काही भक्त त्यांना मातृसुलभ दटावणी करून बळेबळे जेवू घालत. श्रीमहाराजांना मुगाच्या डाळीची साधीशी खिचडी फारच आवडत असे, तसेच मटाराचे दाणे घातलेली खिचडीही ते प्रेमाने खात असत. आजदेखील धनकवडी येथील श्रीशंकर महाराजांच्या समाधी मंदिरात येणाऱया भक्तांना आवर्जून खिचडीचाच ‘प्रसाद’ दिला जातो.

अनेकदा श्रीमहाराज स्वतः खिचडी तयार करीत असत मात्र त्यांची खिचडी बनविण्याची तऱहा काही औरच होती. खिचडी बनविण्यासाठी ते हाताच्या ओंजळीमध्ये मावतील इतके कांदे व लसणीची बोंडे घेत आणि भांडय़ात टाकत असत. सोलणे-निवडणे हा प्रकारच त्यांना मान्य नव्हता. जो पदार्थ समोर दिसेल तो खिचडीच्या भांडय़ात टाकला जात असे. खिचडी शिजू लागली की श्रीमहाराज त्यात हात घालून जोरजोराने खिचडीचे मिश्रण ढवळत असत. त्यासाठी त्यांना कसल्याही साधनाची गरज भासली नाही. (शिर्डीचे बाबासाईदेखील अशाच प्रकारे खिचडी बनवत असत.) खिचडी बनविण्यासाठी श्रीमहाराजांनी कोणत्याही पदार्थांचे मोजमाप वा प्रमाण ठरवलेले नसायचे. किती माणसांसाठी खिचडी तयार करायची आहे हेदेखील ठरलेले नसे. कोणतीही सिद्धता न करता, श्रीमहाराजांनी बनविलेली खिचडी प्रत्यक्षात तयार झाल्यावर मात्र तिची चव इतकी अप्रतिम असे की भक्तांना ती खिचडी वारंवार खावीशी इच्छा होत असे.

श्रीमहाराजांना चहा पिण्याची आवड होती. कुणाही भक्ताघरी जाऊन चहा घेणे किंवा स्वतः चहा करून पिणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या लीलाप्रसंगांचे वर्णन करताना अनेकदा ते ढेकणेमामा किंवा बाबुराव रुद्र यांच्या घरी चहा पीत असल्याचा उल्लेख येतो. कांदाभजी हा देखील श्रीमहाराजांचा आवडता पदार्थ होता. अनेकदा श्रीमहाराज एकादशीच्या दिवशीदेखील कांदाभजी खात असत.

एकदा श्रीमहाराज कोलकात्यात गेले आणि ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता एकाच ठिकाणी बराच काळ बसून राहिले. हे दृश्य तेथे राहणारा एक श्रीमंत गृहस्थ अनेक दिवस पाहात होता. हा गृहस्थ कोलकात्यातील एका मोठय़ा कत्तलखान्याचा मालक होता. तो वृत्तीने मात्र अतिशय भाविक आणि श्रद्धाळू होता. एके दिवशी तो श्रीमहाराजांची विचारपूस करू लागला तेव्हा श्रीमहाराज त्याला ‘मी तुझ्या घरी जेवायला येऊ का?’ असे विचारते झाले. ही कुणीतरी असामान्य विभूती आहे हे जाणून तो म्हणाला, ‘अवश्य’ अन् श्रीमहाराजांना सोबत घेऊन तो घरी गेला. त्याने पत्नीला श्रीमहाराजांविषयी सांगितले आणि भोजनाची तयारी करण्यासाठी ते उभयता घरात गेले.

पतीपत्नी श्रीमहाराजांची पूजा करण्याच्या हेतूने बाहेर आले आणि पाहतात तो श्रीमहाराजांच्या देहाचे तुकडे इतस्ततः पडले होते. पाय तुटलेले, डोके धडापासून वेगळे झालेले, हातही दोन्ही बाजूला फेकले गेलेले, असे हे दृश्य पाहून उभयतांनी किंकाळी फोडली. अतीव दुःखाने ते दोघेही बेहोष झाले. थोडय़ा वेळाने ते शुद्धीवर आले. तेव्हा श्रीमहाराजच त्यांना सावध करीत होते हे पाहून ते म्हणाले, ‘महाराज, काय हे, किती भयंकर स्वरूप आपण दाखविले?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘का? तुझ्या कत्तलखान्यात रोजच असे घडत असते. तेव्हा तुला त्याची भीती वाटत नाही. आज का भीती वाटली?’ एवढे बोलून श्रीमहाराज तेथून न जेवताच बाहेर निघून गेले. श्रीमहाराजांनी डोळ्यात घातलेले हे झणझणीत अंजन समजून येताच त्या गृहस्थाने त्याचे सर्व कत्तलखाने बंद करून नवा व्यवसाय सुरू केला.

चैतन्यस्वरूप ([email protected])