
सामना प्रतिनिधी । मुंबई
हा महात्मा गांधींच्या मारेकर्यांच्या विचारसरणीचा विजय आहे, अशा शब्दांत भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासमोर पराभव पत्करावा लागलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पराभवावर नाराजी व्यक्त केली. आज देशात महात्मा गांधींच्या मारेकर्यांची विचारसरणी जिंकली, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. तर धर्माच्या नावावर मते मागणारे यशस्वी झाले, असे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
भोपाळमधील पराभवानंतर दिग्विजय सिंग यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. पराभवानंतर त्यांनी देशात महात्मा गांधींच्या मारेकर्यांची विचारसरणी जिंकली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सुशीलकुमार शिंदे यांची नाराजी
लोकसभा निवडणुकीत आम्ही तत्त्व समोर ठेवून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो, मात्र धर्माच्या आधारावर मत मागणारे यशस्वी झाले, अशा शब्दांत सोलापूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीचा फटका आम्हाला बसेल असे वाटत होते तसेच ते घडलेही, असे सुशीलकुमार शिंदे पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकालावर शंका
निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो, पण सर्वच बूथवर महाआघाडीचा पराभव होतो हे शक्य वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज निवडणूक निकालांवर शंका व्यक्त केली. लोकसभेचे निकाल आमच्यासाठी धक्कादायक असून त्याचा अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला नऊ ते बारा जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आमच्या दृष्टीने निकाल धक्कादायक ठरल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली.



























































