सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिका रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणार्या कंपन्यांच्या दिरंगाईमुळे गोरगरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारींची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून ‘डेफॉडिल्स’ कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. तर कामात अनियमितता राखणार्या आठ औषध पुरवठा कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्थायी समितीत सांगितले.
पालिका रुग्णालयांमध्ये कर्मचार्यांच्या पदांना मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून आज शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पालिका रुग्णालयात औषध पुरवठा करणार्या कंत्राटदारांच्या हलगर्जी कारभाराचा निषेध केला. पालिकेने अशा कंत्राटदारांवर कारवाई का केली, असा सवाल यावेळी उपस्थित केला. हंगामी पदांना मुदतवाढ देणारी पालिका संबंधित पदे कायम का करीत नाही, असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेनेच्या राजुल पटेल, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीदेखील प्रशासनाला धारेवर धरले.
आयुक्त म्हणतात…
औषध खरेदीसंदर्भात पाच वेळा प्रस्ताव तयार करूनही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने औषध खरेदी रखडल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले. 397 वेळा ऑर्डर देऊनही औषध पुरवठा न करणार्या ‘डिफॉडिल्स’ कंपनीला काळ्या यादीत टाकले असून आठ कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नायरच्या डीनला निलंबित करा
नायर रुग्णालयात एका शिकाऊ डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीने याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नायरच्या डीनला ताबडतोब निलंबित करा अशी मागणी भाजपचे अभिजित सामंत यांनी केली. याप्रकरणी कठोर कारवाई करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
3 जून रोजी विशेष बैठक
आरोग्यासारख्या मुद्दय़ावर प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केला. त्यामुळे 3 जून रोजी विशेष बैठक बोलावत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रशासनाने संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले.
पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेविकांचे पाच हजारांचे वेतन दहा हजार करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. यावर अद्याप निर्णय का झाला नाही याचे स्पष्टीकरणही प्रशासनाने द्यावे, असेही यशवंत जाधव यांनी सांगितले. शिवाय पावसाळ्याच्या तयारीसाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.


























































