
>> मल्हार कृष्ण गोखले
गदिमांच्या एका चित्रपटातील एक विनोदी पात्र म्हणते, आमच्या कंपनीचे नाव बेंद्रे, बोंद्रे, बद्रुद्दीन आणि कंपनी. पैकी बेंद्रे वर गेले. बद्रुद्दीन पाकिस्तानात गेले. राहिलो मी बोंद्रे.
तसे लेखक नंदा खरे म्हणजे ‘खरे-तारकुंडे आणि कंपनी’मधले खरे. मूळ नाव अनंत यशवंत खरे. आय.आय.टी.मधून इंजिनीयर झालेले उच्चशिक्षित व्यावसायिक. त्यांच्या वडिलीं ‘खरे-तारकुंडे’ कंपनी ही जुन्या मध्य हिंदुस्थानातील आणि आताच्या विदर्भातली एक नामवंत बांधकाम ठेकेदार कंपनी. साहजिकच लेखकही त्याच व्यवसायात काम करू लागले.
बांधकाम व्यवसाय हा मनुष्य जीवनाइतकाच प्राचीन व्यवसाय आहे. आपल्याकडच्या ललित साहित्यात त्याबद्दल काय लिहिले गेले आहे? जुन्या काळातले सोडून देऊ. आधुनिक काळात प्रथम इंग्रज सत्ताधाऱयांनी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे इमारती बांधल्या, पूल बांधले, रस्ते आणि धरणे बांधली, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रेल्वे बांधली.
स्वातंत्र्योत्तर काळात मोठी धरणे, मोठे कालवे, मोठे कारखाने, मोठे पूल उभारण्याचे काम धडाक्याने झाल. यातले ललित साहित्यात किती उत्रले? भाक्रा-नानगलच्या विशाल धरण प्रकल्पावर गो. नी. दांडेकरांनी लिहिलेली कादंबरी आणि मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या उभारणीवर शुभदा गोगटे यांनी लिहिलेली कादंबरी वगळता, जवळ जवळ काहीच नाही. प्रस्तुत ‘दगडावर दगड विटेवर वीट’ हे ललित साहित्य नाही. कंपनीचा मालक म्हणजे ठेकेदार आणि अभियंता या दोन्ही भूमिका बजावत, चौतीस वर्षे बांधकाम व्यवसायात काढलेल्या लेखकाचे हे आत्मनिवेदन आहे. जेमतेम पावणेदोनशे पानांचे, पण या पावणेदोनशे पानांच्या मधल्या ओळींमध्ये ‘बिटवीन द लाईन्स’ एका महाकादंबरीचा ऐवज ठासून भरलेला आहे.
लेखकाची शैली रसाळ वगैरे अजिबात नाही. त्यामुळे प्रारंभी तर हे अनुभवकथन तुटकच वाटायला लागते, पण लगेचच लक्षात येतो तो लेखकाच्या शब्दांमधला, वाक्यरचनेतला नेमकेपणा. कसलाही घोळ, पाल्हाळ, गप्पीष्टपणा न आणता एखाद्या इंजिनीयरसारखाच लेखक नेमक्या आणि थेट शब्दांत आपले अनुभव सांगत जातो. आणि तो थेटपणाच वाचकाला एकदम भिडतो. त्याच्या दोन वाक्यांमधला अदृश्य आशय जाणवायला लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळात काय किंवा स्वातंत्र्यानंतरच्या एवढय़ा वर्षांत काय हे बांधकाम ठेकेदार आणि त्यांचे मजूर कसकसे दाबले असतील हे चित्र डोळय़ासमोर उभे राहते. निबीड जंगलात, डोंगरदऱयात, क्षीतिजापर्यंत पसरलेल्या अफाट माळरानांवर, रणरणत्या उन्हात, दुष्काळी काटेरी पठारांवर, पुराच्या फुफाटणाऱया पाण्याने जग गिळू पाहणाऱया नद्यांच्या काठांवर हे बांधकाम व्यावसायिक कसे राहतात? तिथे वीज, पाणी, अन्न, औषधे, पैसे सगळय़ाचीच टंचाई इसते. सरकारी कार्यालयांमधून वेळेवर योजना मंजूर होणे, वेळेवर पैसे उपलब्ध होणे हे कसे अंत पहणारे असते, या सगळय़ाचा वानोळाच लेखकाने इथे दिला आहे. पण लेखकाच्या थेटपणामुळे तो वानाळाच अत्यंत मर्मभेदक आणि त्यामुळे वाचनीय उतरला आहे.
आणि तरी प्रस्तावनेत लेखक म्हणतो की, ‘काही फार जवळचे लोक मला म्हणाले, ‘अरे खऱया इंटरेस्टिंग गोष्टी तू दिल्याच नाहीयेस.’ एकंदरीत बांधकाम व्यवसाय या एका दुर्लक्षित क्षेत्राचे अंतरंग दर्शन घडवणारे हे आत्मनिवेदन वा अनुभवकथन अतिशय वाचनीय. चंद्रमोहन कुलकर्णींचे अर्थवाही मुखपृष्ठ. मनोविकास प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती.
दगडावर दगड… विटेवर वीट
लेखक – नंदा खरे
प्रकाशन – मनोविकास प्रकाशन
पृष्ठ – 171 मूल्य – 250 रुपये


























































