
>> सुधीर सेवेकर
हिदुस्थानी उद्योग विश्वात तळपणाऱया महत्त्वाकांक्षी स्त्रियांच्या संघर्षकथा आपल्याला स्तिमित करतात. हिंदुस्थानसारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अत्तुच्य स्थान प्राप्त करणे ही निश्चित सोपी गोष्ट नव्हे. अढळ आत्मविश्वास, असामान्य बुद्धिमत्ता, निर्णयकौशल्य यासोबतच स्त्री म्हणून तोंड द्याव्या लागणाऱया कौटुंबिक व व्यावसायिक पातळीवरच्या अनंत अडचणींवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावरच या स्त्रियांनी उत्तुंग झेप घेतली. कठोर परिश्रम व बांधिलकीच्या जोरावर त्यांनी खाचखळग्यांनी भरलेल्या स्पर्धेचा काटेरी मार्ग तुडविला आणि त्या यशोशिखरावर विराजमान झाल्या.
कोण आहेत या हिंदुस्थानी उद्योजिका? त्या अनेक आहेत. त्यापैकी केवळ तीस उद्योजिकांची संघर्षगाथा आपल्याला समजून घ्यायची असेल तर ज्योती नांदेडकर अनुवादित आणि साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘भारतीय उद्योजिका’ हे ताजे मराठी पुस्तक वाचले पाहिजे. त्यात निवडक तीस हिंदुस्थानी उद्योजिकांची संघर्षगाथा अत्यंत नेमकेपणाने शब्दबद्ध केलेली आहे. तेही केवळ प्रत्येकीवर सुमारे आठ-दहा पृष्ठांच्या मजकुरातून. प्रत्येक संघर्षकथेतील उद्योजिकांच्या संबंधित अनेक छायाचित्रेही दिलेली आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे मोल अधिकच वाढणारे आहे.
या निवडक तीस उद्योजिकांपैकी काही नावे इथे देतो. मल्लिका श्रीनिवासन, राजश्री पॅथी, वंदना लुथरा, प्रिया रेड्डी, अखिला श्रीनिवासन, अनू आगा, डॉ. अमृता पटेल, इंद्रा नुयी, इंदू जैन, एकता कपूर, कल्पना मोरपरिया, किरण मुजुमदार -शॉ, चंदा कोचर, जरीन मेहता, जिया मोदी, ज्योती नाईक, तर्जनी वकील, नीलम धवन, पिया सिंग, नैना लाल किडवई, प्रिया पॉल, फाल्गुनी नायर, मीरा सांन्याल, मेहर पदमसी, रंजना कुमार, रितू कुमार, रेणुका रामनाथन, रेणू सूद कार्नाड, ललिता गुप्ते आणि सुधा नारायण मूर्ती.
या यादीतील साताठजणींना हिंदुस्थान सरकारने ‘पद्मश्री’ या उपाधीने गौरविलेले आहे. त्यात टाफे ट्रक्टर्सच्या मल्लिका श्रीनिवासन, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अमृता पटेल, पार्क हॉटेल्सच्या प्रिया पॉल, फॅशन डिझायनर रितू कुमार, किरण मुजुमदार शॉ ही नावे ठळकपणे समोर येतात. तर सुमारे बारा-चौदाजणी या वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्रात सर्वोच्य पदावरच्या महिला आहेत. त्यात ऑक्सिस बँकेच्या तर्जनी वकील, एचएसबीसी बँकेच्या नैना लाल किडवई, एबीएन अम्रो बँकेच्या मीरा सान्याल, एचएफडीसीच्या रेणू सूद कानार्ड, इंडियन बँकेच्या रंजनाकुमार, कोटक महिंद्राच्या फाल्गुनी नायर, श्रीराम लाइफ इन्शुरन्सच्या कल्पना मोरपरिया अशा काही उच्चपदस्थ महिलांचा उल्लेख केला पाहिजे. त्या बँकिंग व वित्तीय संस्थांमधून उच्चपदावर काम करतात तेव्हा त्यांना ‘उद्योजिका’ म्हणता येईल.
का? असा प्रश्न निश्चित उभा केला जाऊ शकतो. परंतु उद्योजकता वाढीमध्ये वित्त संस्था-बँका यांचा अत्यंत मोलाचा सहभाग असतो हे लक्षात घेतले तर या महिलांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्यातून उद्योजकता वाढीस बळच मिळाले आहे हे मान्य केले पाहिजे आणि म्हणून त्यांचा या पुस्तकातील समावेश उचित वाटतो.
अलीकडच्या काळात वेगाने वाढणारी इंडस्ट्री म्हणजे प्रसारमाध्यमे आणि करमणूक उद्योग या क्षेत्रातील ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समूहाच्या इंदू जैन, यूटीव्ही संस्थेच्या जरीन मेहता, बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर अशा तिघींचा समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. या महिलांसमोरची परिस्थिती, आव्हाने, पुढील दिशा याची मोठी रोचक माहिती या पुस्तकात मिळते. या सर्वांच्या संघर्षकथा प्रस्तुत पुस्तकात अत्यंत नेमकेपणाने मांडण्यात आलेल्या आहेत. त्या रोचक आहेत. उद्बोधक आहेत, प्रेरक आहेत. याखेरीज ज्या महिलांचा प्रस्तुत पुस्तकात समावेश केला गेलेला आहे त्यात लिज्जत पापडच्या ज्योती नाईक, डीएलएफ या कंपनीच्या पिया सिंग, हॅव्हलेट पॅकर्ड या संगणक -लॅपटॉप कंपनीच्या नीलम धवन, पेप्सिकोच्या इंद्रा नुयी, सुधा मूर्ती आदींचा समावेश आहे. या सर्वच उद्योजिकांच्या जीवनकार्याच्या वर्णनात अनुवादिका ज्योती नांदेडकर यांनी कुठेही पाल्हाळीकपणा न ठेवता नेमकेपणाने वर्णन केलेले आहे. त्यांची भाषा सोपी, ओघवती आणि अत्यंत प्रेरक आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक विलक्षण प्रेरक आणि माहितीपूर्ण ठरलेले आहे.
मराठी माणसाने स्वयंरोजगार, उद्योजकता, सृजनशीलता या क्षेत्रात पुढे येणे ही काळाची गरज आहे. प्रस्तुत पुस्तकामुळे ती प्रेरणा मराठी समाजास निश्चित मिळेल. मोठे व्हायचे असेल तर कष्ठास-परिश्रमास पर्याय नाही हाही एक महत्त्वाचा आणि कालसुसंगत संस्कार प्रस्तुत पुस्तक निश्चित करते. मराठी समाजाच्या प्रगतीसाठी अशी पुस्तके म्हणूनच मोठय़ा संख्येने आणि वारंवार मराठी समाजापुढे आली पाहिजेत. त्या भूमिकेतूनच साकेत प्रकाशन यांच्या प्रस्तुत ‘भारतीय उद्योजिका’ या पुस्तकाचे आपण स्वागत केले पाहिजे.
भारतीय उद्योजिका – कॉर्पोरेट क्षेत्रातील स्त्रियांच्या संघर्षकथा
लेखिका – सुमन वाजपेयी
अनुवाद – ज्योती नांदेडकर
प्रकाशन – साकेत प्रकाशन
पृष्ठ – 264 मूल्य – 275 रुपये,


























































