अशोक चव्हाण यांचा आज राजीनामा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण 27 मे रोजी नवी दिल्लीला रात्री रवाना होत आहेत. या दौऱयात ते आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याचे वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 23 जागा लढवल्या होत्या. स्वतः चव्हाण नांदेडमधून उभे होते. मागच्या निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी आपली जागा राखली होती, मात्र यंदा त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल होऊन लोकसभा निवडणूक लढवणारे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा चंद्रपूरमध्ये पराभव केला. ही जागा सोडली तर काँग्रेसची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे अस्वस्थ झालेले चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला फक्त पक्षाध्यक्ष राहुल गांधीच जबाबदार नाहीत. हे सगळे टीमवर्क आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला अपयश आले त्या त्या राज्यांतल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही आपापले राजीनामे पक्षाध्यक्षांकडे द्यावेत. त्यामुळे पक्षाची नव्याने पुनर्रचना करण्यास त्यांना मोकळीक मिळेल. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे लवकरच ते आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याची शक्यता आहे. 27 मे रोजी ते दिल्लीला रवाना होत असून या दौऱयात त्यांची पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते आपला राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.