धैर्य, संयम दाखवा; लक्ष्यापर्यंत आपोआप पोहोचाल , सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sachin-tendulkar

सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली

 इंग्लंडमधील यंदाची आयसीसी विश्वचषक स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये खेळवली जातेय. त्यामुळे या पद्धतीत रुळण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी धैर्याने खेळावे. शेवटी विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी निर्धार, चतुराई आणि धैर्य हेच गुण लागतात. ते सर्व टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूत ठासून भरले आहेत. त्यांनी या गुणांचा लाभ उठवून पुन्हा विश्वचषकावर आपले नाव कोरावे असा कानमंत्र हिंदुस्थानचा माजी कर्णधार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वर्ल्ड कपसाठी फेवरेट मानल्या जाणाऱया विराट सेनेला दिला आहे.

1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया सचिनने वर्ल्ड कपसाठी निवडलेला हिंदुस्थानी संघ समतोल आणि बलवान असल्याचे सांगितले. तो म्हणाला, टीम इंडियाकडे हार्दिक पांडय़ा, विजय शंकर आणि रवींद्र जाडेजा यांच्यासारखे गुणी अष्टपैलू क्रिकेटर आहेत. शिवाय युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादवसारखे मनगटाने चेंडू फिरवू शकणारे फिरकी गोलंदाज आहेत. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवनसारखे फलंदाज आणि आजही मॅच फिनिशर म्हणून भूमिका पार पाडू शकणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसारखा अनुभवी खेळाडू आहे, असे सचिनने सांगितले.

हिंदुस्थानी वेगवान मारा खरोखरच बलवान

टीम इंडियात जसप्रीत बुमराहसारखा यॉर्कर तज्ञ, भुवनेश्वर कुमारसारखा  स्विंग तज्ञ आणि मोहम्मद शमीसारखा भन्नाट वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा वेगवान मारा खरेच अतिशय बलवान आहे, असे मत सचिनने व्यक्त केले. या वेगवान त्रिकुटाला साथ करायला हार्दिक पांडय़ा आणि विजय शंकरसारखे गोलंदाज आहेतच. त्यामुळे मला तरी संघाची गोलंदाजी मजबूत वाटतेय असेही सचिन म्हणाला.

आपल्या खेळावर सर्व लक्ष केंद्रित करा, स्पर्धेचा फॉरमॅट कोणता आहे याची चिंता करू नका. धैर्य ठेवून खेळलात तर विजय आपलाच आहे हे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने पक्के ध्यानात ठेवावे.