
सामना प्रतिनिधी । पारनेर
पारनेर राळेगणसिद्धी रस्त्यावरील फापाळे कॉम्प्लेक्स समोर लावण्यात आलेल्या टेम्पोस मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून किराणामालासह टेम्पो जळून खाक झाला. आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले. 22 मे रोजी याच कॉम्लेक्स शेजारील भैरवी कॉम्प्लेक्समधील गाळयास आग लागून 15 लाखांचे नुकसान झाले होते. या आगीबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत असतानाच शेजारच्या टेम्पोसही आग लागल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्ती जाणीवपूर्वक आग लावण्याचे काम करीत असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
शहरातील अभिजीत अशोक सातपुते यांचे किराणा दुकाण असून राळेगणसिद्धी रस्त्यावरही त्यांचे भुसा पेंड विक्रीचे दुकाण आहे. किरणा माल किंवा भुसा पेंड खरेदी करून रात्री परतल्यानंतर मालाचा टेम्पो भुसा पेंडच्या दुकाणासमोर ते नेहमी लावतात. नेहमीप्रमाणे अभिजीत सातपुते यांनी सोमवारी सकाळी पुणे येथे जाउन पाच लाख रूपयांचा तेल, तुप तसेच इतर किरणा खरेदी केला. रात्री आठ वाजता ते पारनेर येथे पोहचले. भुसा पेंडच्या दुकाणासमोर टेम्पो लावून चालकासह ते घरी गेले. मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पेट्रोलचा वास येउ लागल्याने कोणी चोर दुचाक्यांमधील पेट्रोलची चोरी करीत नाही ना या संशयावरून कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूच्या खोल्यांमधील तरूण बाहेर आले. त्यावेळी टेम्पोस आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजू बाजूच्या लोकांना माहीती देत कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवाशांना बाहेर काढले. परिसरातील दुचाक्याही हालविण्यात आल्या.































































