राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 17 जूनपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनच्या दुसऱया दिवशी म्हणजे 18 जूनला 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देणाऱया घोषणा अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी विधान भवनामध्ये झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हनुमंत डोळस यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यामुळे डोळस यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जाईल.

18 जून रोजी दोन्ही सभागृहांत सन 2019-20 या वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 27 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतिम अर्थसंकल्पात लोकानुयायी घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

विरोधी पक्षनेतेपदी कोण?
विधान परिषदेतील उपसभापती व विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. ही दोन्ही पदे काँग्रेसकडे होती. विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्यामुळे हे पद रिक्त आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पदही रिक्त झाले आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.