विशेष मुलांसाठी उन्हाळी शिबीर; ‘व्हिजन इन्स्टिट्यूट’ चा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लहान मुलांसाठी विविध प्रकारची उन्हाळी शिबिरे भरवण्यात येतात. लहान मुलांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी आणि मुलांना सुट्टीचा आनंद लुटता यावा, यासाठी अशा शिबीरांचा उपयोग होतो. मात्र, विशेष गरजा असलेली मुले या सगळ्या मौजमजेपासून अनेकदा वंचित राहतात. या मुलांचा विचार करून ‘व्हिजन इन्स्टिट्यूट’ तर्फे अशा मुलांसाठी विशेष उन्हाळी शिबीर राबवण्यात आले आहेत. या शिबीराचा आनंद ही मुलेही घेत आहेत.

या वर्षी ऑक्यूपेशनल थेरपिस्ट डॉ. सायली ऐनापुरे, स्पेशल एज्युकेटर पौर्णिमा सोनावणे आणि नीता कदम यांनी उन्हाळी सुटीत विशेष मुलांसाठी अभिनव उपक्रम राबवला. त्यांनी विशेष बालकांसाठी एक महिन्याचे उन्हाळी शिबीर ‘व्हिजन इन्स्टिट्यूट’ येथे आयोजित केले. विशेष मुलांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शरीराच्या हालचालींची व सांध्यांच्या स्थितीची जाणीव करून देणाऱ्या संवेदना, तसेच स्पर्श, दृष्टी, श्रवण, वास या मुलभूत संवेदनांचा समतोल साधता न येणे अशा अडचणींचा सामना या मुलांना करावा लागतो. त्यामुळे अभ्यासात, दैनंदिन कामे करताना, खेळताना आणि समाजात मिसळताना या मुलांना अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून त्यांना सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी नोंदणीकृत “ऑक्यूपेशनल थेरपिस्ट” कडून करवून घेणे गरजेचे असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत या थेरपीत खंड पडू नये, त्याचबरोबर या मुलांना सुट्टीची मजाही लुटता यावी, हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरामध्ये व्यायाम, सामुहिक खेळ, हस्तकला, नृत्य यासह मुलांच्या सामाजिक संवाद कौशल्यावर आणि शारीरिक कौशल्यांवर लक्ष दिले जाते. विशेष गरजा असलेल्या मुलांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे दरवर्षी असे शिबीर भरवणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.