
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
संभाजीनगरात एका व्यक्तीने शक्कल लढवत पत्नी व सासूला फिरायला पाठवून दुसऱ्या लग्नाचा डाव रचला होता. मात्र याची कुणकुण लागताच पत्नीने इंदुरहून तडक संभाजीनगर गाठले आणि लग्नानंतर तमाशा सुरू झाला. नवऱ्याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगरातील हर्सूल हनुमान मंदिराजवळ राहणारा गणेश राधाकिसन पचलोरे हा वनखात्यात नोकरीला आहे. त्याचे चार वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रतिभा हिच्यासोबत लग्न झाले होते. मूलबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमीच भांडणतंटे होत असत. त्यामुळे गणेशने दुसरे लग्न करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र त्याला पत्नीचा विरोध असल्याने त्याने पत्नी व सासूचा अडथळा दूर करण्यासाठी नामी शक्कल लढवली. 26 मे, रविवारी रोजी सासू जावयाच्या घरी आली असता गणेशने मटणामध्ये गुंगीचे औषध टाकले. दोघींना चक्कर येत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. 28 मे मंगळवारी रोजी दोघींना रुग्णालयातून सोडण्यात आल्याने त्याने बळजबरीने पत्नी व सासू यांना फिरण्यासाठी इंदुरला पाठवले.
पत्नी प्रतिभा ही तिच्या आईसोबत इंदुर येथे फिरत असताना अचानक तिला पती 31 मे शुक्रवारी दुसरे लग्न करत असल्याचे कळले. ती तत्काळ संभाजीनगरच्या दिशेने निघाली. ती रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गावात पोहोचली असता तिच्या पतीने महादेव मंदिरासमोर साडे आठ वाजता जयश्री दुधे हिच्यासोबत लग्न केल्याचे कळले. प्रतिभा तडक हर्सूल ठाण्यात पोहोचून तिने पोलिस संरक्षणात पतीच्या घरी सोडण्याचा हट्ट धरला. त्यासाठी तिने चक्क रास्ता रोकोही केला. पोलिसांनी समजूत घालत तिची तक्रार घेत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग भागिले यांनी पती गणेश राधाकिसन पचलोरेसह सासरा राधाकिसन, दीर संतोष, काका उत्तम, नणंद सुरेखा हरणे, नणंदोई सतेश हरणे, विशाल गवंडर, प्रशांत, हिरालाल हरणेसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढिल तपास करत आहेत.





























































