पशूधन चोरणाऱ्या टोळक्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बोरी

कौसडी, तालुका जिंतूर येथे पशूधन चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी दोन बैलांसह ताब्यात घेतले आहे. जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील दिलीप दुधगावकर यांची बैलजोडी 29 मे च्या रात्री चोरट्यांनी चोरी केली होती. त्यानंतर ही बैलजोडी 31 मे रात्री चोरटे कौसडी कडे घेऊन जात असल्याची माहिती बोरी पोलीस पोलिसांना मिळाली. ही बैलजोडी नागठाणा पाटीजवळ वाहनातून कौसडी येथे नेत असताना तिथे असलेले पोलीस पाटील लिंबाजी ठमके, मुंजाजी ठमके, श्रीकांत ठमके यांनी या बैलजोडीचा फोटो काढला व तो पोलिसांना पाठवला.

बोरी पोलिसांनी तो फोटो फिर्यादीस दाखवला असता हे बैल आमचेच आहेत, असे फिर्यादीने सांगितल्यानंतर बोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौसडी येथून अब्दुल रहेमान अब्दुल करीम कुरेशी (४२) व बशीर खान रशीद खान पठाण यांना ७२ हजार रूपयांच्या बैलजोडीसह ताब्यात घेतले. सदरील लाल कंधारी बैलजोडी अब्दुल रहेमान यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बंदिस्त जागेतील दावणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. बैलांना खाजगी वाहनात टाकून बोरी पोलीस ठाण्यात आरोपीसह आणण्यात आले. बोरी व परिसरातील गावात गेल्या काही दिवसापासून शेतातील आखाड्यातून बैल चोरीला गेले होते. या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले होते. वामन सोळंके खुट्टा, प्रभाकर शिंपले बोरी, भास्कर देशमुख माक, काशिनाथ जीवने कौसडी, दगडोबा वजीर बोरी, राम अंभोरे नागापूर, गावातील बैलजोड्या चोरीस गेल्याची बोरी पोलीस ठाण्याला नोंद आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अब्दुल रहमान अब्दुल करीम कुरेशी व बशीर खान रशीद खान पठाण या आरोपींकडून अनेक ठिकाणी जनावरांची चोरी केल्याचे कबुल केले असून आणखी बैलचोरींच्या प्रकरणात या दोघांचा हात असण्याची शक्यता आहे. या टोळीत आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरोपी अब्दुल रहेमान हा बऱ्याच दिवसांपासून बैलांचा व्यापार करीत होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर कधी संशय घेतला नाही. बोरी पोलीस ठाण्यात सदर आरोपींना आणल्यानंतर, अरे हा तर मी बोरीच्या बाजारात पाहिला….हा तर आमच्या आखाड्याजवळ आला होता, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. डोंगरे, के.जी. पतंगे, अरुण पुरी, बि.डी. शिंदे, ए.बी. पंचांगे, सुनील गिरी, ज्ञानेश्वर चोपडे करीत आहेत. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस आता या गुन्ह्यात आणखी किती आरोपी आहेत व यांनी आणखी किती बैलजोड्या चोरल्या याची कसून चौकशी करणार असून याप्रकरणी एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.