अहमदपूरमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान; शेतकऱ्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

तालुक्यातील हडोळतीसह वळसंगी, हीप्पळगाव, सावरगाव ( थोट ), किन्नी, आनंदवाडी, बाभळदरा, हंगरगा या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, अनेक वृक्ष उन्मळून पडले. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने या भागाला चांगलाच तडाखा दिला. घरावरील, जनावराच्या गोठ्यावरील पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.

हडोळती येथील शेतकरी प्रविण व्यंकटराव मुळके यांच्या शेतातील नवीन तयार केलेला आखाड्याचेही पावसाने नुकसान झाले आहे. पत्र्याचे शेड उडून गेल्याने आखाड्यामधील 10 पोते हरभरा, सालगड्याच्या संसार उपयोगी साहित्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांचा वेग एवढा प्रचंड होता की, पत्र्याचे शेड उडून 500 मीटर दूरवर फेकले गेले. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. हडोळतीसह परिसरातील वादळामुळे 11 के.व्ही. सबस्टेशनला होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने परिसरातील गावासह वाड्यावर अंधार पसरला होता. दुरध्वनीसह मोबाईल टॉवरच्या बॅटरी डाऊन होऊन सेवा विस्कळीत झाली होती. परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक वीज कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वीज वाहिन्यांना धोकादायक ठरणाऱ्या वृक्षाच्या फांद्या तोडणे महत्वाचे आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करावीत, अशी मागणी होत आहे.