
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभेतील दणदणीत यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत दाखल होणार आहेत. 16 जून रोजी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत.
उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येत येणार या बातमी नंतर देशात त्याचीच चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. विविध वृत्तवाहिन्यांवरून तारखेबद्दल अंदाज व्यक्त करण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे 16 जून रोजी श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे आणि हजारों शिवसैनिक ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत रामजन्मभूमी अयोध्येत दाखल झाले होते. त्यावेळी संपूर्ण देशात भगवी लाट उसळली होती. लोकसभा निवडणुकांनंतर आपण शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते. श्रीरामचंद्रांना आणि अयोध्यावासीयांना दिलेला शब्द खरा करत उद्धव ठाकरे अयोध्येत दर्शनाला जाणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नोव्हेंबर महिन्यातील त्या दौऱ्यानंतर केंद्र सरकारकडून राम मंदिरासंदर्भात महत्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात झाली. या दरम्यान न्यायालयाने देखील महत्वाची पाऊले उचलली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी पुलवामा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर देशाच्या सुरक्षेचा विचार लक्षात घेता, शिवसेनेने राममंदिरच्या मुद्द्याला हात घातला नाही. मात्र आता देशात पुन्हा स्थिर सरकार आले आहे. श्रीरामाचा जयघोष करत, त्यांच्या आशीर्वादानेच हे सरकार आले आहे. तेव्हा अनेक वर्षांपासून अडकलेले, कोट्यवधी हिंदुंच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय असलेले प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण व्हावे यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येत येणार असल्याच्या वृत्तानंतर तिथे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्थानिक तयारी लागले आहेत.
जय श्रीराम!
उध्दव ठाकरे 16 जुन को
अयोध्या जायेंगे.— Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2019




























































