रत्नागिरी शहरात पाणीटंचाई, राजीवडावासियांची नगर परिषदेत धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

पाणीटंचाईमुळे रत्नागिरीकर हैराण झाले असून रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील नागरिकांनी पाणीटंचाईची समस्या मांडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेत धाव घेतली.

राजीवडा येथील मुख्य पाण्याच्या टाकीला सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन होते, ते कोसळल्याने पाण्याची टाकी बाजूला काढून ठेवण्यात आली. त्यामुळे विहिरीतून थेट पंपिंग करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. याचा परिणाम म्हणून राजीवडा भागातील काही घरांना जास्त पाणी मिळते, तर काही घरांना कमी पाणी मिळते. या परिस्थितीमुळे राजिवडा भागांमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

यावेळी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी नागरिकांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुदेश मयेकर, नगरसेवक बाबा नागवेकर हे देखिल उपस्थित होते. यावेळी राजीवडा येथील शब्बीर भाटकर, तनवीर सोलकर, जहूर बुड्ये, महंमद हसन होडेकर, नासिर बुड्ये, खातून दाव्त, साजिदा होडेकर, जरिना बुड्ये, यास्मिन होडेकर, फरिदा मिरकर, सईदा फणसोपकर आदी उपस्थित होते.