
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेले काही दिवस मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाने परिसीमा गाठली असून मध्य रेल्वेच्या गाड्या प्रचंड विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. जादा सोडलेल्या उन्हाळी स्पेशल गाड्यांमुळे सुरक्षा साखळी खेचण्याच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाल्याने या गाड्या रखडत असल्याने त्याचा फटका उपनगरीय लोकलसेवेला बसत आहे. गेल्या पंधरवड्यात 500 ते 600 उपनगरीय फेऱयांना त्याचा फटका बसून त्या रद्द करण्याची नौबत रेल्वे प्रशासनावर आली आहे.
पावसाळ्यापूर्वी ट्रक उंच उचलण्याची घेतलेली कामे, उन्हाळी विशेष गाड्यांना प्राधान्य यामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या लोकल प्रचंड विलंबाने धावत असताना त्यात रोजच सिग्नल यंत्रणेसह अन्य बिघाडांची मालिकाच लागल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा तळपत्या उन्हात रोजचा असह्य कोंडमारा होऊन रोजचा लेटमार्क बसत आहे. गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाडाचा अतिरेक झाला आहे. गेल्या 15 दिवसांत मोठ्या बिघाडांमुळे 600 पेक्षा जास्त लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत. लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणाची सरासरीही 90 टक्क्यांच्या खाली गेली आहे.
याआधी सरासरी आठवड्याला एक मोठा तांत्रिक बिघाड घडायचा व दोन ते तीन छोटे बिघाड घडायचे. आता हेच प्रमाण दिवसाला एक मोठा बिघाड आणि चार ते पाच छोटे बिघाड असे झाले असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे जेथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे ट्रफिक नाही अशा धिम्या मार्गावर फारसे बिघाड होत नसून लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे क्रॉसिंग असणार्या जलद मार्गावर जास्त बिघाड होत आहेत. त्यामुळे कल्याणच्या पुढील प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बिघाडांची मालिका अशी घडली
- 21 मे – आंबिवली ते टिटवाळादरम्यान रुळाला तडा.
- 26 मे – कुर्ला स्थानकात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोकल घसरली.
- 28 मे – कळवा येथे दुपारी 1 वाजता सिग्नल बिघाड
- 4 जून – सायं. 5.40 च्या सुमारास परळच्या झाडांना आग.
- 5 जून – पहाटे 5 वाजता डोंबिवलीजवळ सिग्नल बिघाड.
- 6 जून – सकाळी सहाच्या सुमारास खडवलीजवळ रुळाला तडा.
रेल्वे फाटकांवरील शहरी ट्रफिकमध्ये वाढ
रेल्वेच्या फाटकांना वाहनांसाठी सारखे उघडझाप करावे लागत असल्यानेही लोकलसेवेत व्यत्यय येत आहे. अनेक रेल्वे फाटकांना बंद करून तेथे रेल्वेच्या हद्दीत उड्डाणपूल तयार असूनही पुलांना उतार देण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात स्थानिक पालिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने रेल्वे फाटके खुली राहत आहेत. रेल्वे फाटकांना फार वेळ उघडे ठेवण्यासाठी प्रसंगी रेल्वे कर्मचाऱयांना मारहाण केल्याचे किंवा रेल्वे फाटकांवर वाहन धडकावल्याच्या घटना घडल्या आहेत.




























































