
सामना ऑनलाईन । पुणे
वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्या ऍमेझॉन कंपनीला चुना लावणार्या कंपनीच्या दोन कर्मचार्यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. अचल मानगावकर आणि रशीद चौधरी असे आरोपींची नावे आहेत.
अचल आणि रशीद हे दोघे ऍमेझॉनमध्ये गेली तीन वर्षे काम करत होते. ऍमेझॉनवर कॅश ऑन डिलीव्हरी असा पर्याय असतो. त्यानुसार ग्राहक वस्तू मिळाल्यानंतर त्याचे पैसे देण्याची सोय असते. जर ग्राहकाला एखादी वस्तू नाही आवडली तर ती वस्तू परत करून पैसे परत मिळवण्याची सुविधा कंपनी देते.
याचा गैरवापर या दोघांनी केला. दोघांनी ऍमेझॉनवर २० बनावट आयडी बनवले होते. या आयडीवरून दोघांनी अनेक वस्तू मागवल्या. नंतर या वस्तू आवडल्या नाही म्हणून परत करत. पण या वस्तू कंपनीला परत मिळत नसत. नंतर कंपनीच्या कायदेशीर सल्लागार पूजा भोसले यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर गुन्ह्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास करून अचल आणि रशीद यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून 17 लाख 13 हजार रुपयांचा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.



























































