
सामना प्रतिनिधी, जिंतूर
येथून जवळच असलेल्या अकोली येथे कर्जबारीपणास कंटाळून गजानन बबनराव रोकडे (30) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
अकोली परिसरात मागील अनेक दिवसांपासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या खाद्यासह पाण्याची परिस्थितीही बिकट झाली आहे. सततची नापिकी व महिन्द्रा फायनन्सचे दीड लाख व मध्यवर्ती बँकेचे 50 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. या विवंचनेत ते नेहमी असायचे. ते परत करता येत नसल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परीवार आहे. त्यांच्या या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.



























































