अंबरनाथ तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबरनाथ 

शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या व्यावसायिक अभ्यासक्रमात डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र शासनमार्फत एमएचसीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी गत वर्षापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये फॅसिलीयेशन सेंटर बहाल करून प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणी आणि प्रमाणपत्र तपासणी केली जात होती. विद्यार्थ्यांना आणि पालकांना सोईचे पडावे म्हणून प्रत्येक क्षेत्रात सदर केंद्रे उभारली जात होती.

परंतु या वर्षी फॅसिलीयेशन सेंटर ऐवजी सेतू सुविधा केंद्र या नावाने महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यात किमान एक सेतू सुविधा केंद्र बहाल करण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सेतू केंद्र बहाल करण्यात आले. परंतु सदर एकही सेतू सुविधा केंद्र अंबरनाथ तालुक्यात बहाल करण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी आणि पालक संताप व्यक्त करत आहेत. अंबरनाथ तालुक्याची व्याप्ती बरीच मोठी असून येथील हजारो विद्यार्थी दरवर्षी विविध व्यावसायिक अभ्याक्रमात परिसरातील महाविद्यालयात प्रवेश घेतात. येथील काही पालकांनी स्थानिक आमदार किसन काठोरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आणि अंबरनाथ तालुक्यात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करणारे पत्र दिले आहे.

आमच्या सूत्रानुसार माहिती काढल्यावर असे निदर्शनास आले आहे की अंबरनाथ तालुक्यात गेली दोन वर्ष सातत्याने आणि यशस्वीरित्या सुविधा केंद्र चालवणारे महाविद्यालय हे कान्होर, बदलापूर पश्चिम येथील ‘भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ होते. सदर महाविद्यालयाने याही वर्षी सदर सेतू सुविधा केंद्र मिळण्याबाबत योग्य ती विनंती सदर प्रशासनीय अधिकाऱ्यांना केली होती परंतु सदर महाविद्यालयाला यावर्षी सदर सेतू सुविधा केंद्र बहाल करण्यास शासन उदासीन आहे.

शासनाचा अंबरनाथ तालुक्या संबंधी असा दुजाभाव का म्हणून याबाबत विद्यार्थी आणि पालक वर्गात कुरबुर सुरू आहे.
भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कान्होर, बदलापूर पश्चिम येथील प्राचार्यांना संपर्क साधला असता ते अजूनही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले परंतु अजून प्रयत्नाला यश नसल्याचे कळवले.