एकवीस नव्हे… वीस एक! अंकमोजणीची ‘बालभारती’ची नवी पद्धत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात बालभारतीने अंकमोजणीची नवी पद्धत अवलंबली असून या पद्धतीमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. एकवीस, बावीस…असे शंभरपर्यंत अंक मोजण्याची पारंपरिक पद्धत सोडून यंदा वीस एक – एकवीस, वीस दोन – बावीस… ते थेट नव्वद नऊ – नव्याण्णव असा अंक शिकवणीचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. शिक्षकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोडाक्षरांची भीती निर्माण होईल, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.

तर दुसरीकडे विषयतज्ञांनी ही पद्धत रुळल्यास अंक लक्षात ठेवण्यास विद्यार्थ्यांना सोपे जाईल, असे स्पष्ट केले आहे.
शाळेचा सोमवारी पहिला दिवस दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे चर्चेत राहिला. दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम यंदापासून बदलण्यात आला आहे. दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अंक मोजणीच्या पद्धतीवरून शिक्षकवर्तुळात मतभिन्नता आहे. अंकांमधील जोडाक्षरे डावलून पाढे बोलण्याची नवी पद्धत रुजू करण्यात आली आहे. जोडाक्षरांचा उच्चार कठीण असतो म्हणून अंकाच्या थेट उच्चाराऐवजी वीस एक, वीस दोन ते थेट नव्वद एक, नव्वद दोन असे शब्दप्रयोग करण्यास सांगितले आहे. या बदलामुळे बालभारतीला नेमके काय साध्य होणार आहे? आकडेमोड करताना व पाढे पाठ करताना जुनी पध्दत अयोग्य होती का? हे बदल करताना गणितीय पध्दतीचा विचार केला की भाषिक विचार या संभ्रमात सध्या शिक्षक आहेत.

विद्यार्थी जोडाक्षरे कधी शिकणार?
भाषेत जोडाक्षरांना फारच महत्त्क आहे. जोडाक्षरे, स्पष्ट उच्चारण, शब्दांचे चढ – उतार ही भाषेची मूलभूत अंगे शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर शिकवली जातात. अंकाच्या उच्चारत ‘एक्केचाळीस, एकावन्न, एकसष्ट, पंच्याहत्तर, ब्याऐंशी, त्र्याण्णव’ अशी जोडाक्षरे असून अंक मोजण्याच्या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थी भाषिक अंगाच्या विकासापासून दूर राहतील, अशी भीती अंधेरी येथील हंसराज मोरारजी स्कूलमधील शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केली.

अंक लक्षात ठेवण्याचे काम सोपे
इंग्रजीत ट्वेण्टी वन, ट्वेण्टी टू या पद्धतीने नव्वदपर्यंत अंक मोजण्याची पद्धत आहे. याप्रमाणेच मराठीतही ही पद्धत आणली असून ती रुळल्यास अंक लक्षात ठेवण्याचे काम सोपे जाईल. आपल्याकडे 1 ते 9 हे मूल्यांक असून प्रत्येक दशकापुढे मूल्यांक जोडून दिल्याने नक्कीच विद्यार्थ्यांचा फायदा होईल. असे मराठी विषय अभ्यास मंडळ, एसएससी बोर्डचे माजी निमंत्रक डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले आहे.