अनंतनागमध्ये मेजर शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग भागात सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्याचा खात्मा केला असून मेजर केतन शर्मा शहीद झाले. तर लष्कराच्या आणखी एका अधिकाऱयासह तीन जवान जखमी झाले. दोन्हीकडून अजूनही गोळीबार सुरू असल्याचेही रात्री उशिरा सूत्रांनी सांगितले. जवानांनी पूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

अनंतनाग भागात चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलाचा जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली असताना दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. त्यात मेजर केतन शर्मा शहीद झाले.

अनंतनाग जिल्हय़ात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जम्मू-कश्मीर पोलीस दलातील सद्दर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी (एसएचओ) अर्शद अहमद खान यांच्यावर सोमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलाने त्यांना असा शेवटचा ‘सॅल्यूट’ मारला आणि बघणाऱयांचे डोळे पाणावले.

पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला- एलईडीचा वापर
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा भागातील अरिहल गावात हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांनी एलईडीचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात 9 जवान जखमी झाले. गेल्या बुधवारीही अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले होते. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला होता.