Maharashtra Budget Session : विकासाचा रोड मॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील दुष्काळ लक्षात घेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे ठरणारे निर्णय आणि राज्याच्या गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा अर्थसंकल्प मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

या तरतुदींनुसार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2015-16 ते सन 2019-20 या कालावधीकरिता 30 हजार कि.मी. लांबीचे उद्दिष्ट आहे. त्यावर रु. 18 हजार 150 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. यातील महत्त्वाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुके व 390 गावांमधून जाणार असून यावर सुमारे रु.55 हजार 335 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सदर महामार्गाचे काम 1 जानेवारी 2019 रोजी सुरू झाले असून बांधकामाचे 16 पॅकेजेसमध्ये नियोजन करण्यात आले आहे. 14 पॅकेजेसचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने काम सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरातील प्रवासाच्या वेळेत बचत करण्याकरिता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पावर रु.6 हजार 695 कोटी इतका खर्च अपेक्षित असून या मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. मुंबई येथील प्रस्तावित वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूची उभारणी व अनुषंगिक कामे सुरू झाली आहेत. सदर प्रकल्पाची किंमत रु.11 हजार 332 कोटी 82 लक्ष इतकी असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

या खेरीज रस्ते वाहतुकीसंबंधी तरतुदी पुढील प्रमाणे-
22 कि.मी. लांबीच्या शिवडी न्हावा शेवा-मुंबई पारबंदर या प्रकल्पाची रु.17 हजार 843 कोटी किंमत असून कामास मार्च 2018 पासून सुरुवात.हा प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
ठाणे खाडी पूल-3-सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर तिसऱ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्यासाठी रु.775 कोटी 58 लक्ष इतक्या किंमतीस प्रशासकीय मान्यता.हा प्रकल्प खाजगी सहभागातून. काम प्रगतीपथावर
आतापर्यंत 29 हजार 76 कि.मी. लांबीच्या 7 हजार 284 कामांना प्रशासकीय मंजूरी. त्यापैकी 8 हजार 819 कि.मी. लांबीची कामे पूर्ण. उर्वरित 20 हजार 257 कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर. सदर कामासाठी आशियाई विकास बँकेकडून रु.४ हजार २५४ कोटी एवढे कर्ज उपलब्ध होणार
राज्यात आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग मिळुन एकुण 2 लाख 99 हजार 446 कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित. रस्ते विकास योजनेत एकूण 3 लाख 36 हजार 994 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट