सामना प्रतिनिधी । रावेर
रावेर तालुक्यातील निंबोल येथील भरवस्तीत असलेल्या विजया बँकेवर मंगळवारी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचे सहायक व्यवस्थापक जागीच ठार झाल्याची घटना घडली. भर दुपारी घडलेल्या थराराने तालुका हादरून गेला असून दोन्ही दरोडेखोर मात्र पसार झाले आहेत.

निंबोल येथील विजया बँकेत मंगळवारी दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. यावेळी बँकेत तीन कर्मचारी होते. काही कळण्याच्या आत बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक करणसिंह नेगी यांच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. शेजारीच असलेले कॅशियर महेंद्रसिंग राजपूत यांच्यावरही पिस्तूल रोखले, मात्र राजपूत हे सायरन वाजविण्यासाठी खाली वाकल्याने जीव वाचवण्यात यशस्वी झाले. सायरन वाजल्यामुळे दरोडेखोरांची धांदल उडाली. दरम्यान, सायरन वाजताच आजूबाजूच्या नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली मसाकाचे व्हाईस चेअरमन भागवत पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, गोपाळ पाटील, वैभव महाजन, विनोद पाटील यांच्यासह आजू बाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. त्यापूर्वीच दरोडेखोर आपल्या मोटरसायकलवरून पसार झाले होते.
नाशकात मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा
दरम्यान, सहायक व्यवस्थापक नेगी यांना गंभीर अवस्थेत रावेर येथे ओम सर्जिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, ज्ञानेश्वर पाटील व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली.
नाशिकमध्येही पडला होता असाच दरोडा
याआधी नाशिकच्या उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात 14 जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कंपनीचा ऑडिटर ठार झाला तर दुसरा ऑडिटर जखमी झाला.






























































