हिंदुस्थानी लष्कराची क्षमता वाढवणार, युद्धादरम्यान शत्रूला सडेतोड उत्तर देण्याची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानला ताळय़ावर आणण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर आपली ताकद वाढवत आहे. याच हेतूने पाकिस्तानच्या सीमेवर ऑक्टोबरपर्यंत नवीन वॉर ग्रूप स्थापन केले जाणार आहेत. त्यानंतर चीनच्या सीमेवरही या ग्रूपची स्थापना केली जाणार आहे. यामुळे शत्रूला युद्धादरम्यान सडेतोड उत्तर देता येणार आहे.

कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या सीमेवर नवीन इंटिग्रेटेड बॅटल ग्रूप म्हणजेच वॉर ग्रूप सक्रिय राहणार आहेत. पश्चिम कमांडमध्ये या ग्रूपची क्षमता तपासण्यासाठी अभ्यास करण्यात आला होता. याला लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे लवकरच दोन ते तीन इंटिग्रेटेड बॅटल ग्रूपची स्थापना केली जाणार आहे. दरम्यान, लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.

वॉर ग्रूपमध्ये तीन-चार युनिट असतील. प्रत्येक युनिटमध्ये किमान 800 जवान, तर प्रत्येक ग्रूपमध्ये 5 हजार जवानांचा सहभाग असेल. ग्रूपचे नेतृत्व मेजर जनरल रँकचे अधिकारी करतील. हे ग्रूप लष्करासाठी ’गेम चेंजर’ ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.