संशयितांना आश्रय देणारे दोघे परप्रांतीय ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । नाशिक

मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचे नाशिक कनेक्शन पोलिसांच्या हाती आले आहे. काही दरोडेखोरांना आश्रय देणाऱ्या सातपूरस्थित दोघांना घेवून गुन्हे शाखेचे पथक परराज्यात मुख्य संशयितांचा शोध घेत आहेत. दरोडेखोर लुटमारीत यशस्वी झाले असते तर त्या दिवशी मुथूट फायनान्समधून कोटय़वधींचे सोने आणि रोख रक्कमेची लूट झाली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सवर गेल्या शुक्रवारी, 14 जूनला सकाळी साडेअकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या गोळीबारात एकजण ठार झाला. धोक्याचा सायरन वाजविल्याने दरोडेखोरांना लूट न करताच पळ काढावा लागला. सीसीटीव्ही फुटेजवरून संबंधित गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. त्यांनी वापरलेल्या पल्सर मोटारसायकलपैकी एक एका परप्रांतीयाची असून, तो सातपूर भागात राहतो. दरोडेखोरांपैकी दोघे दोन महिन्यांपासून त्याच्याकडे आश्रयास होते, अशी माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांचा एक नातलग व अन्य एक अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना परराज्यात नेवून संबंधित गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलीस पथक करीत आहे. नाशिकमधील काही सराईत गुन्हेगारांचा या गुन्ह्यात सहभाग असावा, त्यांनीही मदत केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

..तर कोटय़वधींच्या सोन्याची लूट झाली असती
दरोडा पडला त्यादिवशी 14 जूनला या फायनान्स कंपनीत पंधरा ते वीस कोटी रुपये किंमतीचे सोने होते. या उलाढालीचे ऑडिट सुरू होते. दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखविल्यानंतर धोक्याचा सायरन वाजविणारा ऑडिटर संजू सॅम्युयल याला दरोडेखोरांनी गोळ्या घालून ठार मारले. त्याने सायरन वाजविला नसता तर कोटय़वधी रुपये किंमतीच्या सोन्याची लूट झाली असती. काही कोटींचे सोने मुथूटमध्ये होते, निश्चित किंमत सांगता येणार नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मद्यपी गुन्हेगारांचा अड्डा
मुथूट फायनान्स आणि सिटी सेंटर मॉलच्या मध्ये असलेल्या नाल्यावर अनधिकृत टपऱ्या आहेत. या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर असतो. रात्री या नाल्यालगत उघड्यावर मद्यपी गुन्हेगारांचा हैदोस सुरू असतो. त्यांचे या गुन्ह्याशी लागेबांधे आहेत का, याचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.