भातशेतीचे व्यावसायिक भवितव्य : ‘कर्जत शताब्दी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. म्हणून या वर्षी विकसित झालेल्या या भाताच्या जातीला ‘कर्जत शताब्दी’ असे नाव देण्यात आले आहे. बोटवेल या स्थानिक जातीवर पहिल्यांदाच किरणोत्सर्गाचा वापर करून ही नवी जात विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे. कर्जत शताब्दी ही नवीन जात भातशेतीला व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनवेल अशी अपेक्षा आहे.

भातशेती हे कोकणातले मुख्य पीक असले तरी पोटापाण्यापुरतीच भातशेतीची लागवड होताना दिसते. भातशेतीला अजूनही व्यावसायिक शेतीचे स्वरूप प्राप्त झालेले नसताना तिला व्यावसायिक शेतीकडे नेणारी एक आमूलाग्र घटना कोकणमध्ये घडली आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. या संशोधनाला एक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे, कारण 14 ऑगस्ट 1919 साली स्थापन झालेल्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. म्हणून या वर्षी विकसित झालेल्या या भाताच्या जातीला ‘कर्जत शताब्दी’ असे नाव देण्यात आले आहे. बोटवेल या स्थानिक जातीवर पहिल्यांदाच किरणोत्सर्गाचा वापर करून नवी जात जन्माला घालण्याचे काम विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. कर्जत शताब्दी ही नवीन जात भातशेतीला व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनवेल अशी अपेक्षा आहे.

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील सहयोगी संशोधन संचालक डॉ.रमेश कुणकेरकर, एम.पी.गवई, एम.एच.केळुसकर आणि सिध्दार्थ कदम या संशोधकांच्या चमूने गेली दहा वर्षे मेहनत घेऊन कर्जत शताब्दी ही नवी भाताची जात विकसित केली. डॉ.रमेश कुणकेरकर हे 14 वर्षे विद्यापीठात संशोधन करत आहेत.त्यांच्या संशोधक चमूने 2008 पासून मेहनत घेत नवी कर्जत शताब्दी जात विकसित केली.ही जात विकसित होण्यामागे एक घटनाक्रम आहे. बोटवेल ही पारंपरिक भातशेतीची जात. कर्जत येथील प्रगतशील शेतकरी नाना गांगल यांनी बोटवेल भातशेतीतून पोह्याचे उत्पादन करायला सुरुवात केली. ते स्वतः भातशेती करत तसेच आजूबाजूच्या शेतकऱयांकडून बोटवेलचा भात विकत घेत पोहा आणि त्यांची तांदळाची गिरण चालवत असत. बोटवेल ही कोथिंबीरसारखी भाताची जात. तिला एक सुवास आहे. त्यामुळे ती इतर भाताच्या जातींपेक्षा थोडे वेगळेपण जपून आहे. ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील संचालक कर्जत येथे आले तेव्हा प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी नाना गांगल यांची भेट घेतली. नाना गांगल यांनी त्यावेळी बोटवेल या भातपिकावरच आपण संशोधन करा असे सुचवताना या भातापासून बनलेल्या पोह्याला चांगला दर मिळेल अशी माहिती दिली. त्यानंतर 2008 साली कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने बोटवेल या जातीवर संशोधन सुरू केले. बोटवेल ही थोडी उंच वाढणारी आणि 145 दिवस लागणारी भाताची जात आहे. त्यामुळे त्या जातीवर संशोधन करत असताना पहिल्यांदाच भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरच्या मदतीने बोटवेल जातीवर किरणोत्सर्गाचा वापर करून त्या जातीच्या गुणसूत्रांत जनुकीय बदल करण्यात आला. त्याची उंची कमी करण्यात आली तसेच पिकासाठी लागणारा काळ हा 125 ते 130 दिवसांवर आणला आणि या प्रयोगातूनच कर्जत शताब्दी ही नवी जात 10 वर्षांच्या अथक संशोधनानंतर विकसित झाली.

कर्जत शताब्दी भाताचा उपयोग हा पोह्याच्या उत्पादनामध्ये करणे अधिक फायदेशीर आहे. कारण कर्जत शताब्दीपासून तयार होणाऱया पोह्याला 60 रुपये किलोचा भाव मिळेल.कर्जत शताब्दीची लागवड शेतकरी व्यावसायिक दृष्टीनेही करू शकतात. तयार केलेल्या पोह्याची विक्री करून त्यातून त्यांना उत्पन्नही मिळू शकते. कर्जत शताब्दीचा आणखी एक उपयोग म्हणजे त्याच्या पिठापासून अतिशय उत्कृष्ट मोदक तयार होतात. विद्यापीठातील संशोधकांनी संशोधनाबरोबरच पिठापासून मोदक तयार करण्याचाही प्रयोग केला.मोदकाच्या पिठाची विक्री होऊ शकते. या तांदळाला वास असल्यामुळे त्याची विक्री राष्ट्रीय बाजारात तर होईलच, पण त्याबरोबर सूक्ष्म दाणा असलेला सुवासिक भात म्हणून निर्यातही होऊ शकते. हा दूरदृष्टिकोन ठेवणे चुकीचे ठरणार नाही. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने आतापर्यंत 28 भातशेती जाती विकसित केल्या आहेत. मात्र ही जात शताब्दी वर्षामध्ये विकसित झाल्यामुळे तिला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.शेतकऱयांकडे आजही अनेक पारंपरिक भातशेतीच्या जाती आहेत.त्याचे गुणसूत्र टिकवणे गरजेचे असून अशा काही जातींवर प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे.

[email protected]