मनासारखे काम करायला मिळतंय यासारखा आनंद नाही- सिद्धार्थ चांदेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धार्थ चांदेकर…मराठीतला चॉकलेट बॉय. क्लासमेट्स, झेंडा, गुलाबजाम या सिनेमांत विविधांगी भूमिका साकारून तो तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. वेबसीरिज, मालिका, चित्रपट यांचे एकाचवेळी शूटिंग करताना धावपळ होत असली तरी हे काम मी मनापासून एन्जॉय करतोय, असे त्याने आगामी ‘मिस यू मिस्टर’ सिनेमानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मिस यू मिस्टरबद्दल काय सांगशील?

ही एकमेकांच्या अत्यंत प्रेमात असलेल्या एका कपलची गोष्ट आहे. लग्नानंतर काही कारणामुळे नवर्‍याला परदेशी जावे लागते. घरात नवरा नसल्यामुळे सासू सासऱयांसोबत राहताना त्या मुलीला काय अडचणीत येतात? त्याला ती कसे सामोरे जाते? यात पाहायला मिळेल. एकंदरीत आजच्या जमान्यातील लाँग डिस्टन्स रिलेशनशिपवर हा सिनेमा आधारित आहे.

मृण्मयीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

खूपच छान. मृण्मयी ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे. करिअरची सुरुवात आम्ही एकत्र केली. जुनी मैत्रीण असल्याने सेटवर आम्ही खूप धमाल करायचो. दहा वर्षांत ती करीयरच्या वेगळ्या उंचीवर पोहचूनही माणूस म्हणून ती तशीच आहे.

तू खूप निवडक सिनेमांतच झळकला आहेस, असे का?

सिनेमा निवडताना कलाकाराला बर्‍याच गोष्टींचा विचार करावा लागतो. मी फक्त कलाकार नाही तर माझ्यावर घराची जबाबदारी देखील आहे. एखाद्या सिनेमामुळे माझे करीयर कोणत्या उंचीवर जाईल, मला किती पैसे मिळतील, कलाकार म्हणून माझी कशी प्रगती होईल याचा विचार करतो. अभिनय हा काही व्यवसाय नाही. हे कलाक्षेत्र आहे. आपल्यातली कला जागी ठेवण्यासाठी काही गोष्टींना नाही म्हणावे लागते आणि काही गोष्टींना स्वीकारावे लागते.

एकाचवेळी मालिका, वेबसिरीज आणि चित्रपटांचे शूटिंग करताना धावपळ होते का?

धावपळ तर होतेच आहे, पण मी हे सगळं मनापासून एन्जॉय करतोय. आपल्या मनासारखे काम करायला मिळणे यासारखा आनंद  नाही.