
सामना प्रतिनिधी । देवरुख
राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगाराचा भोंगळ कारभार चर्चेत असताना आज चक्क प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे-घोडवली घाटात धावत्या एसटी बसचा मागील टायर अचानक निखळला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आज, शनिवार (दि.२२) दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
रत्नागिरी आगारतुन देवरूखकडे जाणारी एसटी क्रमांक एम एच-४० – एन – ९२०३ ही प्रवाशांनी भरली होती. घोडवली-वायंगणे घाट उतरत असताना वायंगणेच्या अलीकडे या धावत्या गाडीचे मागचे २ टायर अचानक निखळले. एसटीच्या गतीवरून चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर का गाडीचा वेग जास्त असता तर मोठा अपघात घडला असता. मात्र चालकाने वेळीच एसटीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. गाडी बाजूला लावल्यानंतर चालक, वाहकांनी दुसरी गाडी मागवून घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता मागून येणार्या गाडीत तुम्हाला बसवून देतो, असे प्रवाशांना सांगितले. यामुळे प्रवाशांचा पारा आणखीन चढला. देवरूख डेपोच्या कारभाराचा गेल्या काही महिन्यांपासून बोजवारा उडाला आहे. गाड्या वेळेत न सुटणे, गाड्या सुस्थितीत नसणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. या कारभारावर योग्य नियंत्रण नसल्याने देवरूख डेपोचा कारभार ढिसाळ झाल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.




























































