लिव्हस्पेस केपनीला ग्राहक आयोगाचा दणका; सदोष इंटिरिअर कामाप्रकरणी 71.62 लाख रुपये परत करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्लॅटच्या नूतनीकरणाचे काम अपूर्ण ठेवणे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे व सुरक्षेच्या गंभीर त्रुटीबद्दल लिव्हस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इंटिरिअर डिझाइन कंपनीला  ग्राहक निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीचे वर्तन म्हणजे निष्काळजीपणाचा कळस असल्याचे निरीक्षण नोंदवत आयोगाने कंपनीला ग्राहकाचे 71 लाख 62 हजार 4 रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर या रकमेवर 1 सप्टेंबर 2024 पासून वार्षिक नऊ टक्के व्याज देण्याचेही बजावले आहे.

गोरेगाव येथील एका रहिवाशाने आपल्या 30 व्या मजल्यावरील सदनिकेच्या इंटिरिअर डिझाइन आणि नूतनीकरणाचे काम लिव्हस्पेस कंपनीला दिले होते. त्यासाठी ग्राहकाने कंपनीला 71 लाख 62 हजार 4 रुपये आगाऊ दिले होते. हे काम 90 ते 120 दिवसांत पूर्ण करून एक जुलै 2024 रोजी सदनिकेचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र, कंपनीने ही मुदत पाळली नाही. त्यानंतर एक सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच राहिले. याप्रकरणी ग्राहकाने आयोगाकडे दाद मागितली. त्यावेळी कंपनीच्या सदोष कामामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्राहकाने केला. किचनमधील सदोष पद्धतीने बसवलेले एक शटर पत्नीच्या डोक्यावर पडल्याचे तसेच बेडच्या पॅनेलमागे विजेच्या तारा उघडय़ा ठेवण्यात आल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले. आयोगाने याची गंभीर दखल घेत कंपनीवर ताशेरे ओढले.

निकृष्ट साहित्याचा वापर

कंपनीने नामांकित ब्रँडची उत्पादने आणि उच्च दर्जाचे साहित्य वापरण्याचे आश्वासन देऊन ग्राहकाकडून पैसे घेतले; मात्र प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला. कंपनीला नोटीस बजावूनही कंपनीच्या वतीने कोणीही सुनावणीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे या प्रकरणात ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रास, शारीरिक मनस्ताप आणि सुरक्षेच्या धोक्यापोटी कंपनीने एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच खटल्याच्या खर्चापोटी 50 हजार रुपये अदा करावेत, असे आदेश आयोगाने दिले तसेच मूळ रक्कम 71 लाख 62 हजार व्याजासह परत करण्याचे बजावले.