
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
सध्या मराठवाड्याला बसत असलेल्या दुष्काळाच्या झळया तीव्र आहेत. शुक्रवारी पडलेल्या पावसाने वातावरण जरी बदलेले असले तरी घशाची कोरड दूर करण्यासाठी पाण्याशिवाय पर्याय नाहीच. बीड जिल्ह्यातील परळी 50 वर्षानंतर तीव्र दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहे. अंदाजे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या शहराला सध्या शेकडो सरकारी खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मात्र ही व्यवस्था अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोठा पाऊस न झाल्यास खडका बंधाऱ्याद्वारे जायकवाडीचे पाणी परळीला देता येऊ शकते. शहरापासूनच जवळ असलेल्या खडका बंधाऱ्यातून थर्मल पॉवर स्टेशनला पाणीपुरवठा केला जातो. मागील काही काळापासून थर्मल बंद असल्याने हे पाणी वापरात आलेले नाही. हे पाणी परळी शहराला देण्यात यावे यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न झाले. शुक्रवारी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात यासाठी चंदूलाल बियाणी यांनी याचिका देखील दाखल केली आहे.
न्यायालयाचा निर्णय येईल त्यावेळेस येईल मात्र आत्ता गरज आहे ती परळीकरांची तहान भागविण्याची,हे पाणी थर्मलसाठी आरक्षित असल्याने ते नगर परिषदेला देता येणार नसल्याचे यापूर्वीच महानिर्मितीकडून सांगण्यात आलेले आहे. जायकवाडीतून पाणी सोडल्यास आम्ही परळी न.प.ला पाणी देऊ असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे. खडका बंधाऱ्यात जायकवाडीचे पाणी सोडल्यास परळीकरांचा पाणीप्रश्न दूर होऊ शकतो,मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय पुढाकाराची गरज
खडका बंधाऱ्याला थेट जायकवाडीतून पाणी दिले जाते. सध्या बंधाऱ्यात असलेले पाणी परळीला जेमतेम 7 दिवस पुरेल एवढेच असल्याचे समजते. जायकवाडीचे पाणी खडका बंधाऱ्यात आणण्यासाठी कोण पुढाकार घेणार? राजकीय दृष्ट्या महत्व असलेले एक विरोधी पक्षनेतेपद आणि एक कॅबीनेट मंत्रीपदासह जिल्ह्याच्या खासदारही परळीत आहेत. मात्र तहानलेल्या परळीकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी कोण पुढे येणार अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.
खडका सर्वात चांगला पर्याय
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर प्रकल्पातून खडका बंधाऱ्यात पाईपलाईन केलेली आहे गरज आहे ती फक्त खडका बंधाऱ्यावर जेमतेम 4-5 फूट जोडणीची. असे केल्यास थेट पाणी शहराला मिळू शकते आणि शहराला होत असलेला खर्चिक टँकरचा पाणीपुरवठा थांबवला जाऊ शकतो.




























































