
सामना प्रतिनिधी । राजुरी
मराठवाड्याला दुष्काळ पाचवीला पुजला आहे पण हा दुष्काळ भूतकाळ व्हावा पाणी हा महत्वाचा प्रश्न सुटावा यासाठी सर्वजन साथ देत आहेत. राज्याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी व पशु संवर्धन मंत्री ना.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शनिवारी जयदत्त क्षीरसागर जिल्ह्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी नवगण राजुरीच्या श्रीगणेशाची आरती करून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री बदामराव पंडीत, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
क्षीरसागर म्हणाले की, ज्या गावात बोटाला धरून चालायचे शिकलो, लहानाचा मोठा झालो त्या गावामुळे व गजाननाच्या कृपाशिर्वादामुळे आज मला मोठे पद मिळाले आहे. श्री गणेशाचे भक्कम आशिर्वाद आणि समर्थ साथ आहे ही सारी कृपा त्यांचीच आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला मंत्री पदाची संधी दिली आहे या संधीचा राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे. राज्याचा दुष्काळ कायमचा थांबविण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्राकडून अधिक निधी मिळवून हा प्रश्न नक्कीच सोडवून घेऊ. समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी आग्रहाची भूमिका घेतली जाईल. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आहेत त्यासाठी व्यापक भूमिका घेऊन पुढे जाण्यासाठी आपल्या समर्थ साथीची गरज आहे. मी जेव्हा काही करतो तेव्हाच मागतो म्हणून आगामी काळात सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासाची कामे करावयाची आहेत. दिनदलित आणि गोरगरीबांचे आशिर्वाद मिळावेत यासाठी त्यांचेही प्रश्न सोडवायचे आहेत. सर्वांची लाख मोलाची मदत मिळावी हिच गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो असे ते म्हणाले.




























































