
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्रच्या ऐश्वर्या खुबचंदानीने चमकदार कामगिरी करत चौथ्या एनएससीआय अखिल भारतीय खुल्या (ज्युनियर व सीनियर) स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींचे 17 वर्षांखालील जेतेपद मिळवल्यानंतर महिला गटाच्या जेतेपदाचादेखील मान मिळवला. महाराष्ट्राच्या अभिषेक प्रधानने पुरुष गटात अजिंक्य पदावर मोहोर उमटवली.
15 वर्षीय ऐश्वर्याने चांगली कामगिरी केली. विशेष करून महिला गटातील तिची कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल. जेतेपदाच्या प्रवासात तिने दोन अव्वल मानांकित खेळाडूंना पराभूत केले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात ऐश्वर्याने महाराष्ट्राच्या दुसर्या मानांकित सचिका बलवानीला 3-1 अशा फरकाने पराभूत केले. ऐश्वर्याने एनएससीआय येथे झालेल्या लढतीत 11-4, 12-10, 7-11, 11-3 असा विजय मिळवला. महिला गटातील ऐश्वर्याचे हे पहिलेच जेतेपद आहे. त्यापूर्वी ऐश्वर्याने अव्वल मानांकित उर्वशी जोशीला पाच गेममध्ये नमवले.




























































