काशीद समुद्रात दोन पर्यटक बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेले दोन जण बुडल्याची घटना सायंकाळी घडली. अभिषेक म्हात्रे (32. रा. पनवेल), पूजा शेट्टी (28, रा. कोपर खैरणे) असे बुडालेल्याची नावे आहेत.

पूजा शेट्टी, रोहिणी कटारे या दोघी 23 जून रोजी सकाळी 11वाजता आपले नातेवाईक अभिषेक म्हात्रे याच्या सोबत मुरुड येथील फार्म हाऊसवर फिरण्यास आल्या होत्या. सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हे तिघे काशीद समुद्र किनाऱ्यावर आले. काशीद ते प्रकृती दरम्यान अभिषेक व पूजा समुद्रामध्ये पोहण्यास उतरले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक व पुजा हे बुडू लागले. हे पाहताच किनाऱ्यावर असणाऱ्या रोहिणी आरडा ओरड केली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन अभिषेक व पूजा याना पाण्याच्या बाहेर काढले.

अभिषेक व पूजा याना बाहेर काढल्यानंतर त्यांना त्वरित बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना तपासले असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मुरुड पोलीस पुढील तपास करीत आहेत.