
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘44 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 25 जून रोजी काँग्रेसने केवळ सत्तेसाठी देशाला बंदिशाळा बनवून लोकशाही आणि माध्यमांना पायदळी तुडवले होते. आणीबाणीचा तो डाग मिटणारा नाही. आता जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी आज अनेक जुन्या-नव्या मुद्दय़ांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
2014 मध्ये मागील सरकारपासून सुटका करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले आणि 2019 ला मिळालेला जनादेश हा गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रामाणिक व यशस्वी प्रयत्नांची पावती आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. कोण हरले आणि कोण जिंकले याचा विचार करण्यापेक्षा देशवासीयांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याचा विचार मी करतो असे ते म्हणाले. तळागाळातील जनतेशी नाते जोडून देशाचा विकास साधणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगतानाच ‘ज्यांचे कोणी नाही त्यांचे सरकार आहे’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
काँग्रेस म्हणते, मुस्लिमांना गटारात राहायचे असेल तर राहू द्या!
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी यांनी आणीबाणीसह अनेक मुद्दय़ांवरून काँग्रेसवर निशाणा साधला. शाहबानो प्रकरणावेळी तत्कालीन काँग्रेस मंत्र्याने एका मुलाखतीमध्ये मुस्लिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला. मुस्लिमांच्या विकासाची जबाबदारी काँग्रेसची नाही. जर त्यांना गटारात राहायचे असेल तर राहू द्या, असे विधान त्या मंत्र्याने केले होते असे मोदी यांनी सांगितले. हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे सांगतानाच मुस्लिम हेसुद्धा या देशाचे नागरिक असल्याने त्यांना पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे असे मोदी म्हणाले. त्यावर काँग्रेस सदस्यांनी पुरावे मागितले. मी यूटय़ूबची लिंक पाठवेन, असे सांगून मोदी यांनी त्यांची बोलतीच बंद केली.
– काँग्रेस इतकी उंच गेली की मुळापासून वेगळी झाली!
आमची उंची कुणीही कमी करू शकत नाही अशी शेखी मिरवणाऱया काँग्रेस नेत्यांचाही समाचार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी घेतला. ‘आम्ही कोणाची रेष कमी करण्यासाठी वेळ वाया घालवत नाही तर स्वतःची रेष मोठी करण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हाला लखलाभ असो, कारण तुम्ही इतके उंच गेला आहात की तुम्हाला जमीन दिसत नाही. तुम्ही मुळापासून वेगळे झाला आहात,’ असे मोदी म्हणाले.
– कुणालाही तुरुंगात टाकायला ही आणीबाणी नाही
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मोदी म्हणाले की, ‘आम्हाला विचारले जाते की तुम्ही काही जणांना तुरुंगात का टाकत नाही. पण कुणालाही तुरुंगात पाठवायला ही काही आणीबाणी नाही. हा न्यायप्रक्रियेचा भाग आहे. ज्यांना जामीन मिळाला त्यांनी आनंद लुटावा.’
ज्यांचे कोणी नाही त्यांचे सरकार आहे!
























































