संडे हो या मंडे संभलकर खाओ अंडे! भिवंडीत आढळला प्लॅस्टिक अंड्यांचा स्टॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिवंडी

उकडलेली अंडी, अंडा बुर्जी, अंडा मसाला, ऑमलेटवर ताव मारणाऱ्यांनो सावधान… तुमच्या ताटात प्लॅस्टिकची अंडी तर नाहीत ना याची खात्री करा… कारण सध्या बाजारात प्लॅस्टिकच्या अंडींनी जोरदार घुसखोरी केली असून भिवंडीतील दुकानांमध्ये ते सर्रास विकले जात आहेत. त्यामुळे ‘संडे हो या मंडे संभलकर खाओ अंडे’ असेच म्हणण्याची वेळ अंडी खवय्यांवर ओढावली आहे.

भिवंडीतील सुरई या गावातील रहिवासी संतोष साळकी यांनी आपल्या घरी खाण्यासाठी माणकोली गाव येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून 40 अंडी विकत घेतली. त्यांची पत्नी मनीषा हिने यापैकी काही अंडी मुलांना खाण्यासाठी उकडली. यावेळी अंड्यांच्या कवचाचे तुकडे झाले, तर त्यातील बलक खात असताना त्या बलकास वेगळाच वास आल्याने त्यांना संशय आला. काही अंड्यांचा आकारही ओबडधोबड आढळल्याने त्यातील काही अंडी फोडून पाहिली असता त्यातील पिकळा बलक वासविरहित आढळला.

परीक्षणासाठी अंडी ताब्यात
संतोष साळवी यांनी ठाणे येथील अन्न क औषध प्रशासनाच्या कार्यालयास संपर्क केल्यानंतर एफडीआयचे निरीक्षक माणिक जाधक यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडील सहा अंडी परीक्षणासाठी ताब्यात घेतली. त्याची चाचणी झाल्यावरच ही अंडी नक्की कसली आहेत ही बाब स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.