
सामना प्रतिनिधी । धुळे
धुळे तालुक्यात 11 जूनला मोठ्या प्रमाणात वादळी वारा वाहिला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तालुक्याच्या दक्षिणेकडील शिरूड, बोरकुंड, विंचुर, रानमळा तसेच वार-कुंडाणे या गावांना मोठा फटका बसला. विजेचे खांब वाकले आणि विद्युत पुरवठा खंडीत झाला. अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र कोलमडले. साहजिकच ग्रामीण भागात कृषी पंपांचा वीजच पुरवठा बंद आहे. 15दिवस झाले तर परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करा अन्यथा वीज कंपनीने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करावी, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
धुळे शहर आणि तालुक्यात 11 जूनला दुपारी चारच्या सुमारास प्रचंड वेगाने वारे वाहिले. या वादळामुळे अनेक झाडी, शेड्स, वीज कंपनीचे खांब कोलमडून पडले. शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस, कुक्कुटपालन शेड, कांदा चाळीदेखील खराब झाल्या. विजेचे खांब वाकून पडल्यामुळे वीजवाहक तारादेखील तुटल्या. साहजिकच कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत झाला. घटना घडण्यास 15 दिवस झाले तरी अद्यापही काही गावांना वीज पुरवठा सुरू झालेला नाही. विद्युत रोहित्र नाही असे सांगून विलंब होईल असे सांगितले जाते. वीज कंपनीने अद्यापही वाकून पडलेले खांब, वीज वाहक तारा हटविलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत समाधानकारक पाउस झाला असता तर शेतकरी पेरण्या करू शकले नसते. तातडीने नव्याने पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करावा. ज्या-ज्या ठिकाणी विद्युत रोहित्र खराब झाले आहेत तेथे नवीन विद्युत रोहित्र बसवावे. येत्या आठवडाभरात विजेची सर्व कामे झाली पाहिजेत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला वीज कंपनीने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराच निवेदनातून देण्यात आला.
कार्यकारी अभियंता किशोर शिंदे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील, चंद्रकांत म्हस्के, गुलाब पाटील, मनोज उचाळे, दीपक गावडे, कृष्णा भिंड, रामराव पाटील यांच्यासह शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































