समस्या ‘माय बीएमसी’वर ट्विट करा… 3 तासांत कार्यवाही करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे समाधानकारकरीत्या करण्यात आली आहेत. मात्र तरीदेखील पावसाळ्यात नालेसफाई किंवा कोणतीही समस्या असेल तर मुंबईकरांनी ही समस्या ‘माय बीएमसी’वर ट्विट करावी. ही समस्या तीन तासांत सोडवली जाईल, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले. पालिकेची सर्व 24 वॉर्ड आता ट्विटरवर असल्याचेही ते म्हणाले.

पालिका मुंबईत नालेसफाईसह सर्व कामे करीत असताना अनेक ठिकाणी नागरिकांच्या बेजाबदारपणामुळे कचरा नाल्यांमध्ये, गटारात, नद्यांमध्ये टाकला गेल्याने समस्या निर्माण होतात. मात्र कोणतीही गैरसोय झाली तरी पालिकेवर टीका केली जाते. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची आणि व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता 25 मि.मी.वरून आता 50 मि.मी. केली आहे. नालेसफाई वर्षभर केली जात आहे. मुंबईकरांना पावसाळा सुकर जाण्यासाठी पालिका कर्मचारी झटत आहेत. आपल्या समस्या मांडण्यासाठी पालिकेची वेबसाईट, व्हॉट्सऍप आणि ट्विटरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईकरांच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठीच जगभरात वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांत नद्यांमध्ये पावसाचे पाणी दिसेल

आयुक्त प्रवीण परदेशी हे मिठी नदी सौंदर्यीकरणासह अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत. त्यांना आपले पाठबळ आहे. यामुळे मिठी नदीसह दहिसर, पोयसरसारख्या मुंबईतील सर्व नद्यांमध्ये तीन वर्षांनंतर फक्त पावसाचे पाणी दिसेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. यासाठी नद्यांना संरक्षक भिंती बांधण्यात येणार असून बेकायदा बांधकामेही हटवली जाणार आहेत. नद्यामध्ये सोडले जाणारे सांडपाणी, मलजल, गटाराचे पाणी बंद केले जाणार असून या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.