
>> अमित घोडेकर
आधुनिकता म्हणजे सुखसोयी… सुविधा उडती टॅक्सी… आपल्याला चांगलं वागायला शिकवणारं घडय़ाळ… नवनवीन गॅझेट्स…
आपण अनेकदा रस्त्यावरील ट्राफिकमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला किंवा आगीत एखादे घर भस्मसात झाले किंवा एखाद्या मुलाचा पेपर वाया गेला. आजकाल तर अनेकदा अनेक लोक विमान पकडण्यासाठी निघतात आणि ट्राफिक ज्याममध्ये अडकल्यामुळे त्यांना विमानदेखील पकडता आले नाही. अशा अनेक बातम्या पेपरमध्ये वाचत आणि ऐकत असतो. त्या वेळेस ट्राफिक जॅममध्ये अडकलेल्या आणि ज्यांचं खरंच काहीतरी नुकसान झालं आहे त्यांना किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
ट्राफिक जाममध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला बघितल्यावर असे वाटते की, अशी काही सुविधा असेल जिचा वापर करून या रुग्णवाहिकेला सरळ एयरलिफ्ट (हवेत उचलून) थेट दवाखान्यात सोडता येईल आणि त्या रुग्णाचे प्राण वाचवता येतील. खरंतर हा फक्त एक विचार झाला; पण आता कदाचित काही वर्षांत अशा प्रकारची एयरलिफ्ट सुविधा प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगातील सगळ्यात मोठी ऑनलाईन टॅक्सी सेवा पुरवणाऱया उबर या कंपनीने आता एयरटॅक्सी या त्यांच्या नवीन सेवेवर मोठय़ा प्रमाणात काम सुरू केले आहे. जगातील अनेक देशांत सध्या उबर या टॅक्सीचा वापर करून कोटय़वधी लोक काही मिनिटांत टॅक्सी सेवा आणि आता तर टॅक्सीत उबरईट म्हणजे जेवणपण दिले जाते… तेच उबरवाले आता थेट आकाशातून टॅक्सी चालवता येऊ शकते का याच्या चाचण्या घेत आहेत. अशा चाचण्यांसाठी उबरची अनेक देशांतील सरकारशी बोलणी सुरू आहेत आणि हिंदुस्थान सरकारशीदेखील ही बोलणी सुरू आहे.
पण आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही उडती कार काय प्रकार आहे… उबरमध्ये नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेत पूर्वी काम करत असलेला मार्क मुर नावाचा शात्रज्ञ आकाशात उडणाऱया टॅक्सीवर काम करत आहे. त्यासाठी जगातील चार सर्वोत्तम विमान कंपन्या उबरला अशा प्रकारच्या टॅक्सी बनवण्यासाठी मदत करत आहेत. याचे नाव जरी टॅक्सी असले तरी वास्तवात हे एक छोटे हेलिकॉप्टर किंवा चार आसनी चिंटू विमान असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिसाईन बनवण्याचे काम सुरू आहे. हे छोटे विमान कोणत्याही मोठय़ा इमारतीवरून उड्डाण घेऊ शकणार आहे आणि अतिशय कमी जागेत उतरू शकणार आहे. एका जागेवरून शेकडो उड्डाण आणि उतरण्यासाठी अतिशय कमी जागेचा वापर करण्यात येणार आहे व कमीत कमी साधनसामुग्री वापरली जाणार असल्यामुळे अशा इमारती म्हणजे एक प्रकारचे छोटे विमानतळ (किंवा भविष्यातील हवाई टॅक्सीतळ) असणार आहेत.
एकीकडे उबर तंत्रज्ञानातील असा चमत्कार करत असताना तिकडे ‘पेव्हलोक’ने एक नवीन ब्रेसलेट आणले आहे. हे दिसण्यासाठी चांगले असे ब्रेसलेट नसून हे एक चमत्कारी ग्याजेट आहे आणि याचा वापर चक्क वाईट सवयी सोडवण्यासाठी केला जात आहे. आता तुम्ही विचार कराल की गॅझेट कसे काय तुमच्या वाईट सवयी सोडवील… तर यात वाईट सवयी सोडण्यासाठी चक्क शॉकचा वापर केला जातो.
‘पेव्हलोक’चे हे गॅझेट मनगटावर घालायचे
मोबाईल ऍपमध्ये तुम्हाला कोणत्या वाईट सवयी आहेत याची नोंद करायची
ज्या वेळेस तुम्ही ती वाईट सवय करत असाल तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला शॉक देईल
उदा. जर तुम्हाला जास्त खायची सवय असेल किंवा जास्त झोपायची सवय असेल तर हे ब्रेसलेट तुम्हाला शॉक देईल
वाईट सवयी सोडवण्यासाठी लागणाऱया या ब्रेसलेटची किंमत मात्र खूप जास्त आहे ती म्हणजे तब्बल 13000 हजार रुपये. आपल्याकडे एक म्हण आहे ती म्हणजे मनाचा ब्रेक म्हणजे उत्तम ब्रेक आणि जर तुमच्या मनाच्या ब्रेकने तुम्ही एखादी वाईट सवय सोडवू शकत नसाल, तर मात्र तुम्हाला पैसे मोजून ‘पेव्हलोक’चे हे गॅझेट मनगटावर घालावे लागेल.





















































