पहिल्याच पावसात धुळे शहरातील रस्ते गाळाने भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

स्वच्छता अभियान राबवीत स्वच्छ आणि सुंदर शहराचा नारा देण्यात आला आहे, मात्र शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने स्वच्छ आणि सुंदरतेबाबत केलेला दावा बऱ्यापैकी फोल ठरविला आहे. पावसामुळे शहरातील बहुसंख्य भागात सर्वत्र पावसाळी किडे उडताना दिसतायत. नाल्याकाठावरील रस्त्यांवर गाळ साचला आहे. काही ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कीडनाशक औषधांची फवारणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

धुळे शहरात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस झाला. रिमझिम बरसणाऱ्या पावसाने काही काळ वेग घेतला. त्यामुळे शहरातील सकल भागात काही काळ पाणी साचले. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरात नाले सफाई करण्यात आली. तसेच शहरातील धूळ काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला, पण पहिल्याच पावसाने हा दावा बऱ्याच अंशी फोल ठरविला आहे. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसामुळे शहरातून जाणारे नाले ओसंडून वाहू लागले. त्याचवेळी नाल्यांमधील गाळ रस्त्यावर पसरला. परिणामी शुक्रवारी या भागात किडे उडताना दिसू लागले. नाल्यातील सांडपाणीयुक्त गाळ आणि किडे यामुळे दुर्गंधी पसरू लागली. अशा परिस्थितीत साधीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभरात नाला परिसरात किडय़ांचा उपद्रव वाढला. उडणाऱ्या किडय़ांचा प्रामुख्याने दुचाकीस्वारांना त्रास झाला. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधला असता कीड नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. लवकरच फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण महापालिकेच्या मलेरिया प्रतिबंधात्मक विभागाचे वसावे यांनी दिले.

शहरातून सात नाले वाहनात. पहिल्याच पावसात अनेक नाले ओसंडून वाहिले. शहरातील सुभाष पुतळ्या जवळून वाहणारा नाला शुक्रवारी दुपारपर्यंत ओसंडून वाहत होता. नाल्यातील गाळ रस्त्यावर पसरल्यामुळे वाहनचालकांना अडचणी आल्या. विशेषतः दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसाचे शहरातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. अनेक शाळकरी मुला-मुलींनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.