
सामना प्रतिनिधी । पुणे
संततधार पावसामुळे कोंढव्यातील ‘अलकॉन’ स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून रॉयल एक्झॉटिका कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमधील 15 मजुरांवर काळाने घाला घातला. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मृत्यूचे तांडव घडले. यामध्ये 9 पुरुष, 2 महिला, 4 मुलांचा समावेश आहे तर दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकासह 14 जणांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल या दोन बिल्डरना अटक करण्यात आली आहे.
कोंढव्यातील अलकॉन स्टायलस इमारतीलगत असलेल्या रॉयल एक्झॉटिका इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी लेबर कॅम्प उभारण्यात आला होता. त्यामुळे कामगारांसाठी 10 ते 15 पत्र्यांच्या खोल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या लेबर कॅम्पमध्ये बिहारमधील एकाच गावातील 10 ते 12 कुटुंबीयांचा समावेश होता. मागील अनेक महिन्यांपासून रॉयल एक्झॉटिका इमारतीच्या बांधकामासाठी उत्खनन करण्यात येत होते. शहरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने अलकॉन इमारतीच्या संरक्षक भिंतीत पाणी मुरल्याने माती भुसभुशीत झाली. इमारतीच्या भिंतीत पाणी मुरल्यामुळे आणि भिंतीला आधार नसल्याने मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भिंत लेबर कॅम्पमधील कामगार राहत असलेल्या खेल्यांवर कोसळून 15 ते 18 कामगार मातीच्या ढिगार्याखाली दबले गेले. ढिगार्याखाली दबून श्वास गुदमरल्याने 15 मजुरांना जीव गमवावा लागला तर स्थानिक नागरिक आणि मजुरांच्या मदतीने दोघांचा जीव वाचविण्यात यश आले. या घटनेच्या चौकशीसाठी पाचजणांची समिती नेमण्यात आली आहे.
बिल्डरांसह 14 जणांविरोधात सदोष मनुष्यकधाचा गुन्हा दाखल
संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरांसह साईट इंजिनीअर, साइट सुपरकायझर आणि मजूर पुरकणारा कंत्राटदार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस लॅण्डमार्कस् या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डरांसह एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनील अग्रवाल, विपुल सुनील अग्रवाल यांच्यासह साईट इंजिनीअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेकाईकांना राष्ट्रीय आपत्कालीन मदत निधीतून चार लाख रुपये आणि कामगार कल्याण निधी विमा योजनेतून एक लाख असे प्रत्येकी पाच लाख रुपये, तर जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वतीने एक लाखाची मदत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार कोढव्यांच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांची पडताळणी केल्यानंतर या मदतीचे धनादेश तातडीने देण्यात येतील, असे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.



























































