
>> दिलीप जोशी
आज पहिला पाऊस आला. तो ‘नेमेचि’ येण्याचे दिवस संपले. हा तरी आता भरभरून पडावा. रस्त्यापलीकडचा निसर्ग ‘शॉवरबाथ’ घेतोय. हळद कुंकवाची उधळण करावी तशी पिवळी-लाल गुलमोहराची फुलं वाऱ्यावर झुलतायत. मातीचा मंद गंध आसमंतात भरलाय. पहिल्या पावसाचं हे विलोभनीय रूप! आता रस्त्यात चिखल होईल, डबकी साचतील, शहरी प्रवाशांची त्रेधातिरपीट उडेल, पण तिकडे शेतकऱ्याच्या मनात आनंद फुलेल. त्याच्या प्रतीक्षेची तितिक्षा (सहनशीलता) कधीच संपत आली होती. अल निनो, ला निना वगैरे ऐकायचं. त्याचे बरे-वाईट परिणाम सर्वांच्याच नशिबी येतात. या विशाल कृषीप्रधान देशातल्या कोटय़वधी नजरा उन्हाळ्याची तलखी वाढली की, आभाळाकडे लागतात. यंदा ‘येरे येरे पावसा’ म्हणूनही बराच काळ लोटला. मध्येच त्या ‘वायु’वादळाने खोडा घातला, भूजलाची पातळी तळ गाठण्याच्याही खाली गेली. आता बरसणारा पाऊस मोसमभर ‘शहाण्यासारखा’ वागावा आणि शिवारं भरभरून धान्य देऊन जावा. अन्नपाण्याची आबादानी व्हावी यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असणार?
पहिल्या पावसाचे दिवस म्हणजे शाळा, कॉलेजच्या नव्या वर्षाचेही दिवस. आमच्या लहानपणी मुंबई भागातल्या शाळा बरोबर 13 जूनला सुरू व्हायच्या. त्याआधी मृग नक्षत्र लागल्याबरोबर 7 तारखेला पावसाने हजेरी लावलेलीच असायची. शाळेचे ‘हजेरीपट’ तेरापासून मांडले जायचे. रेनकोट, छत्र्या, पावसाळी चपला-बूट आणि नव्या वह्यापुस्तकांची खरेदी याला हळूहळू सुरुवात व्हायची. अमक्या तमक्याने छत्री आणली, आपण कधी आणायची? अशी बालमनांची उत्सुकता घरोघर शिगेला पोहोचायची.
त्यावेळी दोन-अडीच वर्षांपासून शिक्षणाचा ससेमिरा नव्हता. ‘प्ले ग्रुप’साठी कुठे नाव नोंदवावं लागत नव्हतं. पाचेक वर्षांपर्यंत प्रत्येक वसाहतीतल्या मुलांचा ‘प्ले ग्रुप’ दिवसभर जवळच्या मैदानावर झाडामाडांवर असायचा. सूरपारंब्या खेळायला वडा-पिंपळाची महाकाय झाडं होती आणि क्रिकेटपासून अगदी विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या खेळायला मैदानं मोकळी असायची. नाही म्हणायला शहरात कुणाच्या घरात ‘मॉन्टेसरी’चा वर्ग चालायचा, पण तो साधारण तासभर. कृत्रिम टबात डुंबणं किंवा छोट्या घसरगुंड्या असली सोय तिथे कुठली असायला! गोलाकार बसून एकेकाच्या मागे नकळत रुमाल टाकत ‘माझ्या आईचं पत्र हरवलं… ते मला सापडलं’ असे खेळ चालायचे. गुप्तेबाईंच्या अशा मॉन्टेसरीत अक्षरओळख, दहापर्यंत पाढे इतकी तयारी झाल्यावर आई मला म्युनिसिपालिटीच्या शाळेत घेऊन गेली. तिथे देशमुख गुरुजी होते. ‘‘किती वय? पाच पूर्ण झालीत? नाही… अहो, मग कशाला एवढी घाई करताय? या पुढच्या वर्षी!’’ आणि आमची वरात वर्षभरासाठी आनंदाने घरी परतली. ते एक वर्ष ‘बुडाल्या’ची खंत करण्याची वेळ आयुष्यात कधीही आली नाही, उलट त्या काळात घरात आणि आवारात जे शिकायला मिळालं ते खूप महत्त्वाचं होतं.
तरीसुद्धा शाळेचा गणवेश, नवी पुस्तकं, त्यातले धडे, कविता यांचं अप्रूप असायचं. ‘‘अमकं-तमकं पुस्तक मला मिळालं, तुला?’’ या प्रश्नात चौकशी तर असायचीच, पण आपल्या हाती आधी सगळी पुस्तकं लागली तर वाटणारं समाधान अधिक असायचं. कोऱ्या पुस्तक-वह्यांना कव्हर घालणं हा एक उद्योग असायचा. ‘गम’ची बाटली असली तर उत्तमच, नाहीतर घरीच बनवलेली पिठाची चिकट ‘खळ’ काम भागवायची. एखाद्याकडे ‘खळ’ बनवली की, शेजारपाजारच्या पोरांनाही कव्हर चिकटवण्याचं आमंत्रण मिळायचं. त्यात कोणी सुबकतेने तर कोणी बेंगरूळ पद्धतीने कव्हर घालायचं. वही-पुस्तकाच्या आतल्या पानांना ‘खळ’ चिकटली तर मोठय़ांचा ओरडा खावा लागायचा, पण त्या कोऱ्या पुस्तकं, वह्यांचा वास नव्या शैक्षणिक वर्षाची नवी जाणीव निर्माण करायचा. जुनी पुस्तकं कुणाला उपयोगी पडत असतील तर देऊन टाकायची. पाठोपाठची भावंडं असतील तर प्रश्नच नसायचा. गतवर्षीच्या वह्या रद्दीत देण्यापूर्वी त्यातले कोरे कागद काढून नीट लावायचे. मग ते रीतसर ‘बायंडिंग’ करून आणायचे. म्हणून त्यातून ‘रफ’ वही तयार व्हायची. शिक्षक सांगतील ते ‘रफ’ वहीत भरभर उतरवून घ्यायचं आणि घरी आल्यावर त्या त्या विषयाच्या फेअर वहीत पुन्हा नीटस नोंदवायचं. यातून त्या विषयाची उजळणीही व्हायची.
शिकवणी किंवा टय़ुशन लावण्याचा तो जमाना नव्हता. एकतर पाल्यांची शाळाच पालकांना जेमतेम परवडत होती. त्यात शिकवणी कुठली? त्याची गरजही नसायची. आमचे अनेक मास्तर पुलंच्या चितळे मास्तरांसारखे हाडाचे शिक्षक होते. आमच्यासारख्या गणित कच्चं असलेल्यांना शाळा सुटल्यावर स्पेशल तास घेऊन शिकवायचे. फुकट! वर घरच्यांना ‘‘घेतोय करून मी त्याची तयारी’’ असंही सांगायचे. त्यामुळे पालक निश्चिंत. आमचे वडील आम्हा भावंडांना वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी ‘‘झालाय ना रे सगळा अभ्यास?’’ एवढा वार्षिक कर्तव्याचा प्रश्न विचारायचे. आम्ही एकमुखाने ‘‘हो।़।़’’ म्हणायचो. रिझल्टच्या आदल्या दिवशीचा प्रश्न म्हणजे ‘‘होशील ना रे पास?’’ इतकाच. त्यावर ‘‘नाही’’ म्हणायची कोणाची शामत होती? थोडक्यात, त्या काळातलं शिक्षण हे असं असायचं. आताचं वाईट आहे अशातला भाग नाही. मुलांना भरपूर काही शिकवलं जातं. त्यांना विविध विषयांचं ‘एक्स्पोजर’ लहानपणापासूनच मिळावं म्हणून.
आता मुलांच्या वजनाइतकी दप्तरं झालीयत. ते ओझं कमी करण्याच्या योजनांचं प्रत्यक्षात काय होतं ते आपण पाहतोय. दप्तर अव्वाच्या सव्वा वाढलंय आणि पाटी कधीच गायब झालीय. पूर्वी ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ असं गंमतगीत होतं. आता पाटीच्या जागी ‘टॅब’ आलेत. ते कालसुसंगतच म्हणावं लागेल. अपेक्षा इतकीच की, शिक्षण पद्धतीने ज्ञान तर द्यावंच, पण अधिक ज्ञानार्जनाची आस वाढवावी. आता विचार करण्याचा तास असं म्हणून आम्हाला विचार करायला लावणारे एक मास्तर होते. एक प्रकारची ती ऑप्टिडय़ूड टेस्टच असायची. त्या काळातली आमच्या म्युनिसिपालटीतली मुलंही पुढे देश-विदेशात चमकली. नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाला सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पावसासारखीच गती आली असेल.





























































