ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुखेड

ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीचे काम करीत असताना लोंबकळत असलेले विजेचे तार अचानक ट्रॅक्टरवर पडल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी व त्याला वाचविण्यासाठी गेलेला दुसरा भाऊ अशा दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भेंडेगाव बु. येथे सकाळी आठच्या दरम्यान घडली.

भेंडेगाव बु. येथील पाटील कुटुंब शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून तालुक्याला परिचित आहेत. आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम करत होते. रमेश सदाशिव पाटील (30) व मंगेश सदाशिव पाटील (27) हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे आज सकाळी शिवारात शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. त्यांच्या शेतात अनेक दिवसापासून विद्युत पोलवरील तार लोंबकळत होता. तो दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी अनेक महिन्यापासून केली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज सकाळी आठ वाजता ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करीत असताना या विद्युत तारा ट्रॅक्टरवर पडल्या. या तारेला मंगेश पाटील यांचा स्पर्श झाल्याने ते तेथेच चिकटले. त्यांचा भाऊ रमेश पाटील यांच्या ते लक्षात येताच हातात काठी घेवून विद्युत तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तार निसटल्याने ती तार रमेश पाटील यांच्या अंगावर पडली. त्यामुळे मंगेश पाटील व रमेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना समजताच गावातील सरपंच लालबा कांबळे व इतर सहकारी घटनास्थळी जावून विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर या दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मंगेश पाटील यांचे गेल्या वर्षीच लग्न झाले असून, रमेश पाटील यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. या घटनेमुळे भेंडेगाव गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान विद्युत तारेच्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही वीज मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळेच या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.