
सामना प्रतिनिधी । कल्याण
गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार कोसळणारा पाऊस आज कल्याणकरांसाठी काळ ठरला. सोमवारी रात्री साडेबारा वाजता दुर्गाडी परिसरातील नॅशनल उर्दू शाळेची भिंत बाजूच्या दोन घरांवर कोसळली. त्यात करिना चाँद (25), त्यांचा मुलगा हुसेन (3) आणि शोभा कांबळे (62) या तीन निष्पाप जिवांचा बळी गेला.
नॅशनल उर्दू शाळेची भिंत 15 फूट उंच होती. रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. भिंतीच्या ढिगाऱयाखाली मातीची दोन कच्ची घरे दबली गेली. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे रहिवासी मदतकार्यासाठी घटनास्थळी धावले. ढिगाऱयाखाली चौघे अडकले होते. स्थानिक, पोलीस, अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगाऱयाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत तीनजणांचा मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आरती कर्डिले ही 16 वर्षांची तरुणी थोडक्यात बचावली. तिच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत्यूनंतरही सुटली नाही मायलेकाची मिठी
ढिगारा उपसताना पहिला मृतदेह सापडला शोभा कांबळे यांचा. यानंतर करिना चाँद यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मिठीतच तीन वर्षांचा चिमुकला हुसेन होता. तातडीने उपचारासाठी मायलेकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाला छातीला कवटाळलेल्या अवस्थेतील करिना यांचा मृतदेह पाहून डॉक्टरांचेही डोळे पाणावले.





























































