
सामना प्रतिनिधी। मुंबई
विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अमलात आणण्यासाठी ‘सारथी’च्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री व कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
या प्रवर्गासाठी ‘सारथी’ संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याच्या संदर्भात सर्वंकष अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विमाप्र कल्याण, कामगारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत सरकारला अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे शासनाकडून योग्य ती मान्यता मिळाल्यानंतर प्रस्तावित संस्था कार्यान्वित होऊन विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बहुजन समाजाचे व त्यातील युवक-युवतीचे मोठे हित साधले जाईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘बार्टी’ तसेच ‘सारथी’ या दोन्ही संस्थांमार्फत संबंधित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या घटकांच्या युवक-युवतींचा विविध माध्यमातून विकास घडवला जात आहे. त्याचप्रकार विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठीसुद्धा विविध उपक्रम अमलात यावे असे सरकारने ठरवले आहे.


























































