
सामना प्रतिनिधी। मुंबई
मेगाभरतीअंतर्गत राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांमध्ये शेकडो पदांवर भरती करण्यासाठी घेण्यात येणारे उमेदवारांचे परीक्षा शुल्क कमी करावे, ही मागणी मंगळवारी विरोधकांनी विधान परिषदेत केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले, मात्र या उत्तरावर समाधान न झाल्याने महापोर्टलच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी सभात्याग केला.
उमेदवाराला 34 जिल्हा परिषदेतल्या एकाच पदासाठी 34 प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराला एका पदासाठी 500 याप्रमाणे 17 हजार तर राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना साडेआठ हजार भरावे लागतात. सरसकट सगळय़ांसाठी सर्व जागांसाठी 500 रुपये करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.




























































