सचिनने शेअर केला वर्ल्डकपदरम्यानचा ‘सुंदर’ फोटो, दिले भन्नाट कॅप्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी खेळाडू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेट समालोचनाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान सचिन तेंडुलकरने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘हा फोटो सुंदर आहे?’ असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. या फोटोखाली नेटकऱ्यांनी देखील तेवढ्याच भन्नाट कमेंट दिल्या आहेत.

हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन व्यावसायिक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना देखील क्रिकेटची आवड आहे. वर्ल्डकपच्या सुरुवातीला त्यांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी माजी विजेता हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. वर्ल्डकपच्या लढतींदरम्यान अनेकवेळा त्यांना प्रेक्षकांच्या व्हीआयपी दालनात पाहण्यात आले आहे.

काय म्हणाले होते पिचाई?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी माजी विजेता हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत होईल. या दोन संघांत विश्वचषकाची फायनल झाली तर मी हिंदुस्थानी संघासाठीच चीअरअप करेन असेही पिचाई म्हणाले. अर्थात टीम इंडियाला न्यूझीलंड आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल असेही पिचाई यांनी म्हटले होते.