दुधापासून मसाल्यापर्यंतची भेसळ रोखणार, खाद्यपदार्थांवर फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दुधापासून चहा पावडर, मसाले आणि सर्वच प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये होणार्‍या भेसळीला रोखण्यासाठी मोबाईल फूड टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारची राज्यातली ही पहिली फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा आहे. मुंबई व राज्यात अजून एक मोबाईल फूड टेस्टिंग लॅब राज्य सरकारच्या वतीने तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ भेसळ तपासणारी यंत्रणा नाही, तर खाद्यपदार्थ  व फळांचा दर्जा तपासणारी यंत्रणाही आहे.

या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्नसुरक्षा अधिकारी, एक विश्लेषक आणि परिचर असे पथक असेल. ही मोबाईल व्हॅन गर्दीच्या व खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्नसुरक्षा व अन्न भेसळीबाबत जागरूकता करणार आहे. तसेच अन्नाची प्राथमिक तपासणी करणार आहे. या मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थ तसेच दूध, तूप, तेल, चहा पावडर, मसाल्यांमधील भेसळयुक्त पदार्थ ओळखणे शक्य होईल. या मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये अन्नसुरक्षेविषयी नियम व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारी माहिती देण्यात येणार आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाइन 1800222365 

  • फिरत्या प्रयोगशाळेत या तपासण्या होणार
  • दुधातील भेसळ
  • चहा पावडरमध्ये होणारी रंगांची भेसळ
  • चटणीसदृश मसाले, पदार्थात होणारी रंगांची भेसळ
  • मधात होणारी भेसळ
  • साखरेत होणारी भेसळ
  • अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी
  • फळांची गुणवत्ता तपासणी
  • फळांचे रासायनिकीकरण तपासणे

दूध आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी तसेच लोकांना शुद्ध आणि आरोग्यदायी, पोषक आहार मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व्यापक उपाययोजना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ही फिरती अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुधाची तपासणी, साखर तसेच चहा पावडरमध्ये केल्या जाणाया भेसळीची तपासणी, भेसळ केल्या जाणार्‍या रंगांची तपासणी करता येईल. चटणी व मसाले पदार्थात होणार्‍या रंगाच्या भेसळीची तपासणीही होईल.

भेसळ तपासणीचा अहवाल येण्यास किमान सात दिवस लागतात. आता फिरत्या प्रयोगशाळेत भेसळ तपासणीचा अहवाल अर्ध्या तासातच मिळणार असल्याने त्यावर कारवाई करणे तसेच भेसळीला आळा बसेल.